खर्डीतील आंतरराष्ट्रीय शाळेतील पालकांचे आंदोलन मागे

खर्डीतील आंतरराष्ट्रीय शाळेतील पालकांचे आंदोलन मागे

Published on

खर्डी, ता. १० (बातमीदार) : यंदाच्या शैक्षणिक वर्षात खर्डी आंतरराष्ट्रीय शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यात आलेला नाही. तसेच शाळेत नवीन मुख्याध्यापक रुजू झाल्याने पालकांनी आक्रमक भूमिका घेत सोमवार, ता. १० जुलै रोजी आंदोलन केले; मात्र गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांनी पुढच्या वर्षी आठवीचा वर्ग सुरू करण्यात येईल. तसेच जुने मुख्याध्यापक सुधीर भोईर यांना लेखी प्रतिनियुक्ती आदेशासाठी शिक्षणमंत्री व विभागीय आयुक्तांकडे लेखी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने खर्डी येथील अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले. या वेळी शहापूरचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी पालकांना मार्गदर्शन केले. पालकांची समजूत काढल्यावर अखेर पालकांकडून आंदोलन मागे घेण्यात आले. या वेळी शेकडो पालक, विद्यार्थ्यांनी शाळेच्या गेटवर आंदोलन केले.

खर्डी येथील जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेतील रुजू झालेल्या नवीन मुख्याध्यापकाने आठवी व नर्सरीचा वर्ग जाणीवपूर्वक बंद केल्याचा पालकांनी आरोप केला होप्ता. तसेच नवीन मुख्याध्यापक विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्याबाबत हलगर्जीपणा करत असल्याचा आरोपही पालकांकडून करण्यात आला होता. तसेच आंतरराष्ट्रीय शाळेचा पाया रचलेल्या सुधीर भोईर या मुख्याध्यापकांची प्रतिनियुक्ती करण्यात यावी, यासाठी शाळा व्यवस्थापन कमिटीने पालकमंत्री, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन याबाबत तक्रार केली होती, परंतु याबाबत तोंडी आदेश दिल्याने त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शाळा व्यवस्थापन समितीने शाळेच्या गेटवर १० जुलै रोजी आंदोलन केले.

या वेळी शहापूरचे पोलिस निरीक्षक अनंत पराड यांनी पालकांची समजूत काढली. तसेच सहापोलिस निरीक्षक नितीन चौधरी यांच्यासह गटशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण, उपसरपंच मौसीम शेख, माजी सरपंच प्रशांत खर्डीकर, शाळा व्यवस्थापन समितीचे पांडुरंग काळे, सोमनाथ म्हसकर, हेमंत परदेशी, स्वाती बागुल व डॉ. किशोर जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

नवीन रुजू झालेल्या मुख्याध्यापकांचा पदभार इतर शिक्षकांकडे देऊन शाळेची गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न होणार आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी तसेच जुने मुख्याध्यापक सुधीर भोईर यांना लेखी प्रतिनियुक्तीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
़- पांडुरंग काळे / सोमनाथ म्हसकर, अध्यक्ष / उपाध्यक्ष, शाळा व्यवस्थापन कमिटी.

फोटो-
खर्डीच्या आंतरराष्ट्रीय शाळेच्या गेटवर आंदोलन करताना पालक व मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक अनंत पराड (छायाचित्र ः नरेश जाधव)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.