मैदानातील सुविधाअभावी खेळाडू वंचित

मैदानातील सुविधाअभावी खेळाडू वंचित

तुर्भे, ता. १० (बातमीदार) ः मैदानातील क्रीडा सुविधांअभावी ३५ प्रकारच्या खेळांपासून खेळाडू वंचित असल्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांना निवेदन देण्यात आले. या वेळी पालिकेने सदर क्रीडा सुविधा पुरवाव्‍यात, अशी मागणी मनसेने केली आहे. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष संदेश डोंगरे, उपशहर अध्यक्ष योगेश शेटे, प्रतीक खेडकर, श्रेयस शिंदे, दशरथ सुरवसे, शहर सचिव समृद्ध भोपी, प्रशांत पाटेकर, शुभम इंगवले, निखिल थोरात हे उपस्थित होते.
नवी मुंबई शहरात विविध क्रीडापटू घडावेत यासाठी महापालिका प्रयत्‍नशील असल्याचे सांगितले जाते; मात्र शहरातील महापालिकेच्या मालकीच्या क्रीडांगणे, क्रीडागृहात तब्बल ३५ प्रकारच्या खेळांच्या सुविधाच नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे खेळाडू घडणार कसे, असा सवाल नवी मुंबईकरांकडून उपस्थित केला जात आहे. या सुविधा निर्माण करण्याबाबत महापालिका प्रशासन उदासीन असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणानुसार महानगरपालिका क्षेत्रातील शालेय क्रीडा स्पर्धांना जिल्ह्याचा दर्जा दिलेला आहे. त्याच अनुषंगाने २००१ पासून जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून करण्यात येते. शासनातर्फे आयोजित होणाऱ्या स्पर्धा प्रकारांमध्ये एकूण ९३ खेळ प्रकारांचा समावेश आहे. या ९३ खेळ प्रकारांपैकी ५८ खेळ प्रकारांमध्ये खेळाडू सहभागी होत असतात. या क्रीडा प्रकारांमध्ये सांघिक व वैयक्तिक स्वरूपाच्या इनडोअर व आऊटडोअर अशा दोन्ही स्पर्धांचा समावेश असतो. या स्पर्धा जिल्हा स्तरापासून राष्ट्रीय स्तरापर्यंत होत असल्याने यामध्ये नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील खेळाडूंना राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळण्याची संधी मिळते. ज्यामुळे शासनाच्या अनेक सुविधा व योजनांचा लाभ खेळाडूंना मिळतो. या स्पर्धेसाठी शहरातील २३० हून अधिक शाळा नोंदणीकृत झाल्या असून, ३० हजाराहून अधिक खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होतात; मात्र यामध्ये ३५ प्रकारच्‍या खेळांच्‍या सुविधा नसल्‍याने खेळाडू वंचित राहिले आहेत.
..................................

चौकट
शहरात दोनच क्रीडा संकुल
सध्यस्थितीत पालिकेच्या मालकीच्या क्रीडा सुविधा केवळ दोनच ठिकाणी आहेत. यामध्ये सीबीडी बेलापूर येथे राजीव गांधी स्टेडियममध्ये क्रिकेट व कबड्डी; तर नेरूळ येथील यशवंतराव चव्हाण क्रीडांगणात फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करता येऊ शकते. ऑलिम्पिक स्तरावर खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या सुविधांपासून शहरातील खेळाडू वंचित आहेत. यामुळे स्पर्धा आयोजनादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने पत्रात म्हटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com