सुकापूर-भगतवाडी रस्त्याची दूर्दशा

सुकापूर-भगतवाडी रस्त्याची दूर्दशा

Published on

सकाळ वृत्तसेवा

पनवेल, ता. १० : पनवेल-माथेरान मार्गावरील सुकापूर-भगतवाडी रस्त्यावरील खड्डे नागरिकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीनही वेळेला या ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे या कोंडीमुळे सूकापूर, आदई, आकुर्ली अशा पाच मिनिटांच्या अंतरासाठी तब्बल अर्धातास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत.
नवीन पनवेलला लागून असलेल्या सुकापूर-भगतवाडी येथील रस्ता पूर्णपणे खड्ड्यांमध्ये हरवला आहे. या रस्त्यावरून ये-जा करताना रोज नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या या रस्त्यावरती उन्हाळ्यात तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र पावसाळा सुरू झाल्यापासून या रस्त्यावर खड्ड्याची चाळण झाली आहे. नेरे, सुकापूर, आकुर्ली, मोरबे अशा अनेक गावांमध्ये जाण्यासाठी या रस्त्याचा वापर केला जातो. या रस्त्यालगत पूर्वीच्या गावाशेजारी आता नागरीकरणानंतर मोठ्या नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून रोज हजारोंच्या संख्येने वाहनांची ये-जा सुरू असते. बहुतांश लोक ठाणे, मुंबईकडे कामाला जाणारे याच रस्त्याने घरी जात असतात. सकाळी शाळा-ऑफीस भरण्याच्या वेळी व संध्याकाळी सुटण्याच्यावेळी या रस्त्यांवर दुचाकी व चारचाकीच्या लांबच लांब रांगा लागत असतात. तसेच शनिवार आणि रविवार फार्महाऊस, तसेच फिरायला येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढलेली असते. अशावेळी भगतवाडी ते आदई सर्कल हा पाच मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी वीस वीस मिनिटे लागत आहेत.
नवीन पनवेल पुलावर क्राँक्रीटीकरण केल्यामुळे दरवर्षी ज्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत होती त्या प्रमाणात या वर्षी होत नाही. याप्रमाणेच सुकापूर-भगतवाडी या रस्त्याचेही क्राँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. आधीच दोन्ही बाजूचे अतिक्रमण, त्यामध्ये रस्त्यांची झालेली चाळण यामुळे नागरिकांना रोज नाहक त्रास होत असून याकडे ना कोणते राजकीय नेते लक्ष देत आहेत, ना सार्वजनिक बांधकाम खाते लक्ष देत आहे. या खड्ड्यांमुळे एखादी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे का, असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहेत.
--------------------------------------
सार्वजनिक बांधकाम विभाग निद्रावस्थेत
पनवेल-माथेरान मार्गावरील सुकापूर-भगतवाडी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेक तक्रारी आणि सामाजिक संस्थांनी निवेदने दिली आहेत. मात्र अद्यापही संबंधित विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.