प्रकल्पबाधितांना एकरकमी चार कोटी भरपाई

प्रकल्पबाधितांना एकरकमी चार कोटी भरपाई

जुईनगर, ता. १० (बातमीदार) : एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या बहुचर्चित न्हावाशेवा- शिवडी सी-लिंक प्रकल्पामुळे बाधित झालेल्या नवी मुंबईतील दिवाळे, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली येथील मच्छीमारांना चार कोटी बारा लाखांची नुकसान भरपाई मिळाली आहे. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मच्छीमारांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले आहेत. त्याच अनुषंगाने सोमवारी (ता. १०) आमदार मंदा म्हात्रे यांनी प्रकल्पबाधित मच्छीमारांबरोबर बैठक घेतली.
एमएमआरडीएने केलेल्या सर्वेक्षणानुसार पात्र झालेल्या मच्छीमारांना नुकसानभरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. सद्यस्थितीत दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली अशा एकूण १३२ मच्छीमारांना व ज्या ८२ मच्छीमारांना पहिला हप्ता प्राप्त झाला आहे त्यांनाही दुसरा हप्ता व तिसरा हप्ता अशी सर्वांना एकरकमी नुकसान भरपाई डीबीटीद्वारे थेट बँक खात्यात जमा झाली आहे. उर्वरित ज्या मच्छीमारांची कागदपत्रांच्या अभावी प्रक्रिया अपूर्ण आहे, त्याची लवकरात लवकर कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे उर्वरित मच्छीमारांनाही लवकरच नुकसान भरपाई मिळवून देणार. माझा कोणताही कोळी बांधव हा या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.
या वेळी आमदार मंदा म्हात्रे यांच्यासमवेत भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. रामचंद्र घरत, महामंत्री डॉ. राजेश पाटील, युवा महामंत्री दत्ता घंगाळे, डोलकर मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग कोळी, खांदेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष नीलकंठ कोळी, फगेवाले मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष अनंता बोस व असंख्य कोळी नागरिक व महिला उपस्थित होत्या.

------------------
न्हावाशेवा-शिवडी सी-लिंक प्रकल्पबाधित नवी मुंबईतील मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता मी गेली चार वर्षे शासन दरबारी पाठपुरावा करत आहे. नवी मुंबईतील दिवाळे, बेलापूर, करावे, सारसोळे, वाशी, दिवा, ऐरोली गाव येथील कोळी समाज मासेमारी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. म्हणून त्यांना संकटातून बाहेर काढणे हे लोकप्रतिनिधी म्हणून माझे प्रथम कर्तव्य आहे.
- मंदा म्हात्रे, आमदार, बेलापूर विधानसभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com