धोकादायक दरड; मृत्यूची टांगती तलवार

धोकादायक दरड; मृत्यूची टांगती तलवार

Published on

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. १० : अँटॉप हिल येथील रावळी कॅम्प जलाशयाजवळ टेकडीखाली राहणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना सध्या जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. पावसामुळे टेकडीतून निसटलेला एक भलामोठा दगड झाडांमध्ये अडकला. दगड काढताना थोडी जरी चूक झाली, तरी ते रहिवाशांच्या जीवावर बेतू शकते. यामुळे टेकडीखालील झोपड्यांना धोका निर्माण झाला आहे. त्यातच धोकादायक स्थितीमध्ये असलेला दगड काढायचा कसा, अशा पेचात ‘एफ उत्तर’ विभागातील अधिकारी अडकले आहेत.

अँटॉप हिल परिसरातील रावळी कॅम्प परिसरात अनेक टेकड्या आहेत. येथील टेकडीच्या खाली महापालिकेचा जलसाठा आणि त्यालाच लागून टेकडीखाली अनेक झोपड्या बांधल्या आहेत. या ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. विविध पक्षांचे स्थानिक नेते आणि रहिवाशांनी केलेल्या मागण्यांचा विचार करून महापालिकेने टेकड्यांवर संरक्षण भिंत आणि जाळ्या बसवल्या आहेत. त्यामुळे दरडी कोसळण्याच्या घटनांना काहीसा पायबंद बसला आहे. यंदा पावसामुळे टेकडीची माती सैल होऊन दगडाचा मोठा तुकडा मातीमधून निखळून तेथील एका झाडावर अडकला.

टेकडीच्या आजूबाजूला मोठी झाडे आणि गर्द झाडी आहे. दगडाचा तुकडा झाडावर अडकला असला, तरी त्यामुळे खालील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पालिकेच्या जलविभागाला यापूर्वी हा दगड हटविण्याचे निर्देश देण्यात आले होते; परंतु हा तुकडा बाहेर काढण्यासाठी एफ उत्तर विभागाने प्रयत्न सुरू केले ​​आहेत. त्यानुसार टेकडीखाली राहणाऱ्या सुमारे १५ झोपडपट्टीधारकांना पालिकेकने निष्कासनाच्या नोटिसा दिल्या आहेत.

चोहोबाजूंनी पेच...
१) रावळी टेकडीच्या खाली पालिका पाणीपुरवठा विभागाचा जलाशय आहे. तीव्र उतारावर दगडाचा तुकडा असल्याने तो काढणे सोपे नसल्याचे जल विभागाने ‘एफ उत्तर’ विभागाला कळवले आहे.
२) झाडात अडकलेला दगड काढण्याचा प्रयत्न केला, तर तो बाहेर काढताना घसरून झोपड्यांवर पडण्याचा धोका आहे. त्यामुळे जलविभागाने एफ उत्तर विभागाला झोपडी हटविण्याचा पर्याय सुचवला आहे.
३) पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी दगडाचा तुकडा झाडावर अडकला आहे, तेथे जायचे झाल्यास झोपड्या हटवल्याशिवाय तिथे पोहोचता येत नाही.

झोपड्या हटणार
पालिकेच्या एफ उत्तर विभागाने समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक बोलावून चर्चादेखील केली. येथील झोपडीधारकांना तेथून लवकरात लवकर हटवावे लागेल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या झोपडीधारकांना तात्पुरत्या स्वरूपात दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.

दरडींना जाळ्यांचा आधार
रावळी कॅम्प परिसरात अशा दोन मोठ्या टेकड्या आहेत. या परिसरात दरडी कोसळू नये, यासाठी पालिकेने संरक्षण भिंती बांधल्या आहेत. असे असले तरी काही टेकड्यांवरील भलेमोठे दगड मातीमधून सैल होऊन कोसळण्याच्या स्थितीमध्ये आले आहेत. त्यांना दरड रोधक जाळ्या बसवून थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

परिस्थिती अतिशय धोकादायक आहे. आम्ही रहिवाशांना तो परिसर खाली करण्याच्या नोटिसा दिल्या आहेत. आधी झोपडीधारकांना तेथून हटवावे लागेल. त्यानंतर ते पात्र की अपात्र, कागदपत्रांची छाननी केल्यानंतर त्यांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे. आमची कार्यवाही सुरू आहे. त्यावर लवकरच तोडगा निघेल.
- चक्रपाणी अल्ले, सहाय्यक आयुक्त, एफ उत्तर विभाग

दरड कोसळण्याचा धोका असल्याने काही झोपड्या हटवाव्याच लागतील; मात्र दरड हटवल्यानंतर सर्व रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करावे.
- मंगेश सातमकर, स्थानिक माजी नगरसेवक

पालिकेने नोटिसा दिल्या आहेत; मात्र आमच्या पुनर्वसनाबाबत ठोस काहीही सांगितलेले नाही. ते सांगितल्याशिवाय घर खाली कशी करणार. पात्र-अपात्र न करता पालिकेने सर्वांचे सरसकट पुनर्वसन करावे.
- व्यंकट मुरुगन, स्थानिक रहिवासी

दरड दुर्घटनेला ५ दिवस झाले. जीव मुठीत घेऊन दिवस काढावे लागत आहेत. धोका पत्करल्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही. आम्ही दुसरीकडे जायचे कुठ, पालिकेने लवकर काम पूर्ण करावे.
- शशी नाडर, स्थानिक रहिवासी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.