खारघरवर रोगराईचे सावट

खारघरवर रोगराईचे सावट

Published on

खारघर, ता. १८ (बातमीदार) : खारघर सेक्टर सोळा वास्तुविहार वसाहतीशेजारी असलेल्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील पंप बंद अवस्थेत आहेत; त्यामुळे सेक्टर पंधरा ते एकोणीस परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पावसाळ्यात मलमिश्रित पाणी रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती रहिवाशांना सतावत आहे.
खारघर सेक्टर पंधरा घरकुल, स्पॅगेटी, वास्तुविहार, सेलिब्रेशन, सेक्टर अठरा आणि मुर्बी गाव सेक्टर १९ आदी वसाहतींमध्ये वाहणाऱ्या सांडपाण्यासाठी सिडकोने वास्तुविहार गृहनिर्माण सोसायटीशेजारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. परिसरातील सांडपाणी निचरा व्हावा, यासाठी सिडकोने या केंद्रात आठ पंप उभारले आहेत; मात्र त्यातील सहा पंप बंद असल्यामुळे सेक्टर पंधरा ते एकोणीस परिसरातील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पावसाळ्यात मलमिश्रित पाणी रस्त्यावर येते. त्यामुळे पावसाळा सुरू झाल्यावर वास्तुविहार, सेलिब्रेशन आणि इतर सेक्टरमध्ये वाहणाऱ्या सांडपाण्यामुळे रोगराई पसरण्याची भीती असल्याने माजी नगरसेविका संजना कदम दोन वर्षांपासून सिडकोकडे पत्र व्यवहार करत आहेत. शिवाय सिडकोकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्यामुळे सोमवारी (ता. १७) माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप खारघर शहरचे पदाधिकारी समीर कदम, ब्रिजेश पटेल, माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांची भेट घेऊन सांडपाण्यामुळे रहिवाशांना होणाऱ्या त्रासाची कल्पना दिली आहे. या वेळी डिग्गीकर यांनी बंद असलेले पंप तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सांडपाण्याच्या दुर्गंधीने हैराण असलेल्या रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
----------------------------------------------
चौकशी अहवाल गुलदस्त्यात
- दोन वर्षांपूर्वी सांडपाणी प्रक्रिया केंद्रात रात्रीच्या वेळी झालेल्या क्लोरिन वायूच्या गळतीमुळे परिसरातील नागरिकांना त्रास झाला होता. या प्रकाराच्या चौकशीसाठी सिडकोने चौकशी समिती नेमली होती; मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.
- पनवेल पालिका अस्तित्वात आल्यावर सिडकोने खारघर आणि तळोजा वसाहतीमधील मलनिस्सारण वाहिन्या पालिकेकडे हस्तांतर केल्या आहेत; मात्र या दोन्ही वसाहतींमधील सांडपाणी प्रक्रिया केंद्र मात्र सिडकोने स्वतःकडे ठेवल्याने याविषयी नागरिकांमध्ये नाराजी आहे.
----------------------------------------------
खारघर सेक्टर पंधरा ते एकोणीस आणि इतर सेक्टरमधील सांडपाणी प्रक्रियेसाठी सिडकोने वास्तुविहारशेजारी सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारले आहे. या केंद्रातील आठपैकी सहा पंप बंद असल्यामुळे पावसाळ्यात मलमिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्याने रोगराई पसरण्याची भीती नागरिकांना सतावत असते.
- समीर कदम, भाजप पदाधिकारी, खारघर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.