दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्याभवनची मुले चमकली
घाटकोपर (बातमीदार) ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत घेतल्या गेलेल्या पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे विद्यार्थी गृह संस्थेच्या विद्याभवन शालेय संकूल, घाटकोपर मधील इयत्ता पाचवीचे ४० तर इयत्ता आठवीचे २४ असे एकूण ६४ विद्यार्थी शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकले आहेत. मराठी माध्यमाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी आसावरी अमोल पाटील हिने मुंबई जिल्ह्यातून दहावा; तर इंग्रजी माध्यमाची इयत्ता पाचवीची विद्यार्थिनी पूर्वा संतोष मेणे हिने मुंबई जिल्ह्यातून २७वा क्रमांक पटकावला आहे. शाळेची गुणवत्ता व दर्जा कायम ठेवून संपूर्ण घाटकोपर विभागातून मराठी व इंग्रजी माध्यमांच्या शाळांपैकी विद्याभवन शाळेचे सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. शिष्यवृत्ती मिळवून गुणवत्ता यादीत झळकलेल्या विद्यार्थ्यांचे, त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे व प्रशालेच्या मुख्याध्यापकांचे पुणे विद्यार्थी गृह संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी यांनी अभिनंदन करून यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पी. एन. पणिक्कर यांच्या स्मृतींना उजाळा
शिवडी (बातमीदार) ः राष्ट्रीय मिल मजदूर संघ सार्वजनिक ग्रंथालय आणि वाचनालयाच्या वतीने ग्रंथालयाचे अध्यक्ष गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने सोमवारी (ता. १७) परेलच्या मजदूर मंदिरमधील ग्रंथालयात आयोजित ‘ग्रंथालय साक्षर चळवळीचे प्रणेते पी. एन. पणिक्कर’ यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वाचक दिन आणि वृक्षारोपण दिन समारंभ पार पडला. या वेळी निवृत्त अधिकारी प्रणय सुर्वे यांच्या हस्ते ग्रंथालय चळवळीचे प्रणेते पी. एन. पणिक्कर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांचे पुण्यस्मरण करण्यात आले; तर खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर, सुनील बोरकर यांच्या हस्ते संघटनेच्या प्रांगणात वृक्षारोपण समारंभ पार पडला. दरम्यान प्रणय सुर्वे म्हणाले की, राष्ट्रीय मिल मजदूर संघासारखे समृद्ध ग्रंथालय गिरण गावात क्वचित दिसेल; मात्र या ग्रंथालयाचा वाचकांनी उपयोग करून घेतला पाहिजे. तसेच डिजिटल वाचनाची आवड आता वाढायास हवी. ती काळाची गरज असेदेखील सुर्वे म्हणाले. या वेळी संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण, लेखक काशिनाथ माटल, ग्रंथपाल ममता घाडी, वाचनालयाचे संचालक मारुती शिंत्रे, जी. डी. आंबेकर प्रतिष्ठान कॉलेजच्या विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते.

मृणाल उद्योगिनी केंद्राला भेट
गोरेगाव (बातमीदार) : ज्‍येष्ठ समाजवादी नेत्या मृणालताई गोरे यांच्या स्मृती दिनानिमित्ताने भाकर फाऊंडेशन कम्युनिटी डेव्हलपमेंट सेंटरमध्ये मोफत शिलाई प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने केशव गोरे स्मारक कल्याण केंद्रात सुरू असलेल्या मृणाल उद्योगिनी केंद्राला भेट दिली. या दरम्यान ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्त्यां मृणाल उद्योगिनीच्या संस्थापक सदस्य साथी ललिता भावे व अध्यक्ष रश्मी सामंत यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या कौशल्य विकसातून स्वयंरोजगाराच्या अनुषंगाने कापडापासून डिझाइनर रजाई, शोल्डर बॅग, पाऊच, स्लिंग बॅग, कापडी पिशवी, साडी फोल्डर इत्यादी मोफत प्रशिक्षणाची व आर्थिक सक्षम करण्यासाठी घरबसल्या उद्योग रोजगारासंदर्भात माहिती दिली. तसेच केशव गोरे स्मारक कल्याण केंद्रातून छोटे उद्योग व रोजगारासाठी लागणारे भांडवल या विषयावर प्रणिता राजगुरे यांनी (व्यवसाय कर्ज) उज्ज्वल योजनेची महिलांना माहिती दिली. या वेळी मृणाल उद्योगिनीच्या उपाध्यक्ष क्षमा नेमळेकर, सहखजिनदार लता भावे, संगीता सप्रे व भाकर फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक सोनावणे आणि महिला उपस्थित होत्या.

वडाळा लोहमार्ग पोलिसांकडून जनजागृती
वडाळा (बातमीदार) ः महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी महिलांची सुरक्षा लक्षात घेऊन वडाळा लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या वतीने वरिष्ठ निरीक्षक डी. एम. खुपेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता. १७) वडाळा पश्चिम येथील आंध्रा एज्युकेशन हायस्कूलमध्ये महिला सुरक्षा तसेच आर्थिक फसवणुकविरोधात विशेष जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. या वेळी पोलिस निरीक्षक काकासो पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक मुकुंदराव देशमुख, गोपनीय शाखेची कर्मचारी, पोलिस नाईक मनोज जाधव, पोलिस अंमलदार मारुती कांबळे तसेच आंध्र हायस्कूलचे मुख्याध्यापक एल. संतीश्री, सहायक मुख्याध्यापक वि. पदमा कुमारी, सुपरवायझर जी. हुमा बिंदू, शिक्षक, कर्मचारी व शाळेतील २८० विद्यार्थी उपस्थित होते.

धरणात बुडून निधन झालेल्या विनोदवर अंत्‍यसंस्‍कार
धारावी, ता. १८ (बातमीदार) : धारावीतील संत कक्कया मार्गावरील सुभाष नगर येथील रहिवासी विनोद गजाकोष याचा खोपोली येथील धरणात बुडून मृत्‍यू झाला होता. त्‍यांच्यावर धारावी हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विनोद यांचे नातेवाईक, मित्रपरिवार तसेच धारावीतील विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. विनोदच्या भावाचे निधन झाल्यावर त्याच्या जागी गेल्या वर्षी विनोदला पालिकेत नोकरी मिळाली होती. विनोदच्या मागे पत्नी, दोन लहान मुले व वडील असा परिवार आहे.

या मुलांचे पालक कोण?
जोगेश्वरी (बातमीदार) ः पोलिसांना विविध ठिकाणी बेवारस स्थितीत विनापालक सापडलेल्या काही मुलींना बालकल्याण समितीतर्फे आशा सदनमध्ये ठेवले आहे. यामध्ये ज्‍योती पंकज वर्मा ही १० एप्रिल रोजी बालगृह डोंगरी येथून बाल कल्‍याण यांच्‍या बदली आदेशाने सुर‍क्षितेसाठी धारवी पोलिस ठाण्‍याअंतर्गत; तर मिष्‍टी अंदाजे वय अडीच वर्षे ही चार मार्च रोजी बाल कल्याण समिती मुंबई यांच्या आदेशाने आशा सदनमध्ये सुरक्षितता व पुनर्वसन हेतू दाखल झाली आहेत. त्‍यांच्‍या पालकांना संस्थेच्या अधीक्षकांशी आशा सदन, आशा सदन मार्ग, उमरखाडी, दूरध्वनी ०२२ २३७१५४७७/२३७४०३९७ येथे संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com