मोक्काच्या आरोपातून सहाजणांची मुक्तता

मोक्काच्या आरोपातून सहाजणांची मुक्तता

Published on

ठाणे, ता. १८ (वार्ताहर) : भिवंडी शहरातील दरोडाप्रकरणी मोक्काअंतर्गत कारवाई केलेल्या सहा जणांची सबळ पुराव्याअभावी विशेष मोक्का न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित एम. शेटे यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती अमित शेटे यांनी निकालात सरकारी पक्षाला सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने सहाही आरोपींना संशयाचा फायदा मिळाला आणि त्यांची मुक्तता करण्यात आल्याचे नमूद केले आहे.
न्यायालयात विशेष सरकारी वकील संजय मोरे यांनी न्यायलयाला सांगितले की, या गुन्ह्यात आठ आरोपींनी हत्यारांसह ४ जून २०१४ रोजी पहाटे गोदाम फोडून त्यातील ५३ लाख रुपये किंमत असलेली केमिकल पावडर लुटली. आरोपींची गोदामाचे कुलुप तोडण्यासाठी कटावणी आणि गॅसकटरचा वापर केला; तर भिवंडी रेहनाळ येथील गोदामात सुरक्षा रक्षक म्हणून तैनात असलेल्या दोघांना धमकावले. या दरोड्याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून मोक्का कलम लावण्यात आले, अशी माहिती मोरे यांनी दिली. या गुन्ह्यात सरकारी पक्षाने तब्बल ११ साक्षीदार न्यायालयात सादर करण्यात आले होते; तर बचाव पक्षाच्या वतीने न्यायालयात पुनीत माहिमकर यांनी युक्तिवाद केला. दरोड्यातील जप्त मुद्देमालाची ओळख पटविण्याचे आव्हान माहिमकर यांनी सुनावणीदरम्यान दिले. तसेच माहिमकर यांनी न्यायालयाला सांगितले की, अटक आठ जणांपैकी एक जण कोरोना काळात फरारी झाला; तर एका आरोपीचा मृत्यू हा न्यायालयीन कोठडीत झाला आहे. न्यायालयात सादर साक्षी आणि पुरावे सबळ नसल्याने न्यायमूर्ती अमित शेटे यांनी उर्वरित सहा आरोपींची मुक्तता करण्याचा निकाल दिला. निर्दोष मुक्तता झालेल्यांमध्ये सलीम फतेह मोहम्मद अन्सारी (३८), अमजद अली बिस्मिल्ला खान (३५), रियाजी सल्लाउद्दीन अन्सारी(३३), अशपाक शफिउल्ला खान (४३), शफिक शफिउल्ला चौधरी (३३) आणि धुरुपराज उरी मौर्या (४८) यांचा समावेश असून अन्य दोन आरोपीमध्ये इरफान सलीम खान हा फरारी झाला; तर शराफत अली धोडे खान याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.