कोट्यवधी खर्चूनही खारभूमी नापिक

कोट्यवधी खर्चूनही खारभूमी नापिक

Published on

कोट्यवधी खर्चूनही खारभूमी नापिक
बांधबंदिस्‍तीच्या देखभाल-दुरुस्‍तीकडे दुर्लक्ष
अलिबाग, ता. १८ : सततच्या येणाऱ्या उधाणाचे पाणी भातशेतीत शिरून गेल्या काही वर्षांत जिल्ह्यातील ३ हजार १६ हेक्टर शेती कायमची नापिक झाली आहे. खारभूमी विभागाकडून आतापर्यंत १५६ पैकी १३५ योजना पूर्ण केल्याचा दावा केला जात आहे. यासाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असले तरी खारभूमीचे संरक्षणात अपयश आल्‍याचे दिसते. यंदाच्या पावसाळ्यात यात नापिक क्षेत्रात आणखी वाढ झाल्याने सरकारने आतातरी खारभूमीकडे गांभिर्याने लक्ष देण्याची मागणी अलिबागमधील शेतकरी करीत आहेत.
रायगड जिल्ह्यात उरण, पेण, अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा या तालुक्यात खारभूमीच्या एकूण १५६ योजना आहेत. यातून २२ हजार ७४९ हेक्टर क्षेत्र समुद्राच्या पाण्यापासून संरक्षित होणे आवश्यक होते. मात्र तसे न झाल्याने अलिबाग तालुक्यातील बहिरीचापाडा, मानकुळे, धेरंड-शहापूर आदी गावे समुद्र गिळंकृत करीत आहे. गणेशपट्टी हे गाव यापूर्वीच समुद्राने गिळंकृत केल्‍याने खारभूमी क्षेत्रासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्याची मागणी जोर धरत आहे.
कोकणातील समुद्र किनारी आणि खाडी किनारी असणाऱ्या शेतजमिनींना खारभूमी असे संबोधले जाते. उधाणांपासून शेतजमिनींचे संरक्षण व्हावे, यासाठी बांधण्यात येणाऱ्या बंधार्‌याला खारबंदिस्ती म्हणतात. पूर्वी या बंदिस्तीच्या देखभाल दुरुस्तीची कामे लोकसहभागातून केली जायची, मात्र आता बंदिस्तीच्या देखभाल दुरुस्तीची कामे खारभूमी विभागाकडून केली जाते.
धेरंड, धाकटापाडा, शहापूर, सातिर्डे, शहाबाजमधील बांध-बंदिस्‍तीच्या योजना नादुरुस्त झाल्या आहेत. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यातील ४६ योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी रायगड जिल्हा खारभूमी विभागाने २१८ कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला आहे. यातील १४ योजनांसाठी ७८ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. अशा प्रकारे डागडुजीसाठी दरवर्षी निधी येत असतो, परंतु त्याचा वापर योग्य पद्धतीने होत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहेत.

अलिबागला सर्वाधिक फटका
रायगड जिल्ह्यात एकूण २२ हजार ७४९ हेक्टर खारभूमी क्षेत्र आहे. यात अलिबाग तालुक्यातील ७ हजार ६१३ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. पैकी ३ हजार १६ हेक्टर जमीन उधाणामुळे कायमची नापिक झाली आहे. माणकुळे, बहिरीचा पाडा, हाशिवरे, कावाडे, सोन कोठा, रांजणखार डावली, मेढेखार, देहेण कोटी यासारख्या गावांना खारबंदिस्तीची योग्य देखभाल न केल्याचा फटका बसला आहे.

खासगी बंदिस्तीकडे दुर्लक्ष
उधाणापासून शेत जमिनीचे रक्षण व्हावे, यासाठी किनारपट्टीवरील भागात खारबंदिस्ती घातली जाते. या बांधबंदिस्तीच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी खारभूमी विभागाकडे असते. उधाणामुळे अनेकदा खारबंदिस्तीला खांडी जाण्याचे प्रकार घडतात. यामुळे उधाणाचे पाणी लगतच्या शेतात तसेच परिसरात शिरून जमीन नापिक होण्याचा धोका संभावतो. कोकणात खासगी आणि सरकारी अशा दोन प्रकारच्या खारबंदिस्ती योजना आहेत. खासगी बंदिस्ती नादुरुस्त झाल्यास सरकार त्‍याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.

आपत्ती व्यवस्थापन आराखड्याची गरज
खारभूमी क्षेत्रात दरवर्षी उधाणामुळे खारबंदिस्तीला तडे जाण्याच्या घटना घडतात. त्‍यामुळे पूरसदृश स्थितीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कृती आराखडा तयार करावा, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाकडून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.

‘उधाणे नैसर्गिक आपत्ती घोषित करा’
पावसाळ्यात समुद्र खवळलेला असतो. उधाण लाटांमुळे किनारपट्टीवरील गावे, लोकवस्ती जलमय होते. मात्र उधाणांचा नैसर्गिक आपत्तीत समावेश न केल्‍याने बाधित शेतकरी आणि नागरिकांना सरकारी मदत मिळू शकत नाही. शेतजमीन नापिक झाल्याने शेतकऱ्यांचे वार्षिक दीड लाख रुपये आर्थिक नुकसान होते. त्यामुळे शासनाने उधाणे नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावी.
- राजन भगत, श्रमिक मुक्ती दल

रायगड जिल्ह्यात १५६ पैकी १३५ योजना पूर्ण झाल्या आहेत. कालांतराने त्यांची दुरुस्तीही करावी लागते. दुरुस्तीसाठी २१८
कोटीचा प्रस्ताव पाठवला आहे. यातील ७८ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. खाऱ्या पाण्यामुळे कांदळवने निर्माण झालेली असल्याने तिथे नूतनीकरणाची कामे करताना मर्यादा येतात. प्रलंबित योजना मार्गी लागण्यासाठीही निधी आवश्‍यक असून यासंदर्भात प्रस्ताव पाठवले आहेत.
- सुरेश सावंत, कार्यकारी अभियंता, खारभूमी-पेण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.