Mumbai Rain Updates
Mumbai Rain Updatesesakal

Panvel Rain Update: अतिवृष्टीमुळे पनवेल परिसरात जनजीवन विस्कळीत, महामार्गावर वाहतूक व्यवस्थाही ठप्प

नवीन पनवेल, ता. १९ (वार्ताहर)ः मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. गाढी नदीला पूर आल्याने पनवेल शहरातील नदीकाठी वसलेल्या वस्तीत पाणी शिरल्याने रहिवाशांना याचा फटका बसला. यावेळी शहरातील भारतनगर झोपडपट्टी, कोळीवाडा, कच्छी मोहल्ला, पटेल मोहल्ला, टपाल नाका, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा, बावन बंगला परिसरात पावसाचे पाणी साचले होते; तर कळंबोलीसह सिडको वसाहतींमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला.


पनवेल परिसरात बुधवार (ता. १९) सकाळपासून मुसळधार पाऊस पडत होता. सकाळच्या सुमारास गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. पनवेल शहरातील बंदर रोड परिसरात असलेल्या न्यायालय परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. जुना मुंबई-पुणे महामार्ग म्हणून मार्गावर ओएनजीसीजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या ठिकाणी चार फुटांपर्यंत पाणी साचल्याने अनेक वाहने अडकून पडली होती. नवीन पनवेल बांठिया शाळेजवळ, कळंबोली, कामोठे या ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ग्रामीण भागात तळोजे मजकूर, आपटा कोळीवाडा, वावंजे गाव, पळस्पे-गणेशवाडी, फरशीपाडा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तालुक्यातील कासाडी नदी दुथडी भरून वाहत आहे. मुसळधार पावसामुळे वाहतूक व्यवस्थाही ठप्प झाली होती.

नदीकाठच्या रहिवाशांना इशारा

पनवेल शहरात अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्याने रिक्षा सेवा बंद होण्याच्या मार्गावर होती. प्रवाशांना पाण्यातूनच वाट काढत निश्चित स्थळी पोहोचावे लागले. गाढी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने पालिका, तसेच तहसील प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला. सायन-पनवेल महामार्गासह कळंबोली-मुंब्रा महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचले होते. रोहिंजण टोल नाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

तांत्रिक बिघाडामुळे लोकलचा खोळंबा

पनवेल रेल्वेस्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चार येथे पांईंट फेल्युअर झाल्याने लोकलचा खोळंबा झाला. त्यामुळे पनवेल रेल्वेस्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. तांत्रिक बिघाडामुळे गाड्या उशिरा धावत होत्या. त्यामुळे बेलापूरवरून येणाऱ्या लोकल रेल्वे ट्रॅकवर अडकून पडल्या होत्या. पनवेलपासून येणाऱ्या मार्गिकेवर मानसरोवरपर्यंत एकापाठोपाठ लोकलच्या रांगा लागल्याने स्थानकांमध्ये प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती.

ग्रामीण भागांत पाणी शिरले

- गेल्या ४८ तासांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याचे प्रकार घडले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याने भीतीयुक्त वातावरण आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरले.
- मुसळधार पावसाने पनवेलकरांना चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक सखल भागात पाणी साचले आहे. आपटा, डोळघर येथील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. तसेच काही गावांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असल्याने त्यांनी नातेवाईकांना कळवले आहे.

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालिका मुख्यालयात सर्व अधिकारी, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त यांनी आपत्कालीन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी अफवांना बळी न पडता आपत्कालीन केंद्राशी संपर्क साधावा.
- गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com