कॉलम

कॉलम

Published on

किरण संखे यांच्या कुटुंबाला मदत सुपूर्द

डहाणू (बातमीदार) : वाणगावमधील किरण संखे हे चिंचणीहून १९ जुलै रोजी रात्री जयप्रकाश जोशी यांच्या कारमधून घरी परत येत होते. या वेळी कोलवली खाजणातील पुलावर पूरपरिस्थिती उद्भवली होती. या वेळी कारमध्ये पाणी भरल्याने ते कारबाहेर आले; मात्र या वेळी किरण पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. या वेळी कारमालक जयप्रकाश ऊर्फ बाबा जोशी, किरण संखे यांचा भाऊ गणेश संखे यांना कोलवली गावातील ग्रामस्थांनी वाचवले होते. किरण संखेच्या कुटुंबीयांना शासनामार्फत तात्काळ चार लाखांची मदत जाहीर करण्यात आली. या रकमेचा धनादेश खासदार राजेंद्र गावित, डहाणू तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी शनिवारी त्यांच्या घरी कुटुंबीयांकडे सुपूर्द केला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य जयेंद्र दुबळा तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

--------
एपीएलए सिंड्रोमने ग्रासलेल्या तरुणीवर यशस्वी उपचार
विरार (बातमीदार) : आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या रुग्ण प्राची राठी हिला तीन दिवस डाव्या पायामध्ये वेदना जाणवत होत्या. तसेच त्या भागात सूजदेखील आली होती. हिमोग्लोबिनचे (अ‍ॅनिमिया) प्रमाण कमी झाले होते. तसेच डाव्या पायाच्या नसांमध्ये मल्टीपल क्लॉट्समुळे रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होत असल्याचे निदान झाले. अशा या दुर्मिळ एपीएलए सिंड्रोमने ग्रासलेल्या २२ वर्षीय तरुणीवर वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. रुग्णाला अँटी-फॉस्फोलिपिड सिंड्रोम (एपीएस) नावाचा दुर्मिळ थ्रोम्बोटिक विकार असल्याचे निदान या वेळी करण्यात आले. एपीएलए सिंड्रोम ज्याला अँटीफॉस्फोलिपिड सिंड्रोम म्हणूनदेखील ओळखले जाते, हा एक स्वयंप्रतिकारशक्तीचा विकार आहे. जो रक्ताभिसरणात अडथळे निर्माण करतो. एपीएलए सिंड्रोम असलेल्या व्यक्तींना असामान्यपणे रक्त गोठण्याची समस्या जाणवते. या यशस्वी उपचारांनंतर रुग्णाला दम लागणे बरे झाले. तसेच ४८ तासांनंतर रुग्णाचे कृत्रिम ऑक्सिजन बंद करण्यात आले. रुग्णाला वैद्यकीयदृष्ट्या सुधारित स्थितीत तोंडावाटे रक्त पातळ करणारे औषध आणि सपोर्टीव्ह थेरपी देऊन घरी पाठवण्यात आले.

--------
जूचंद्र येथे ज्ञानेश्वरी पारायण
विरार (बातमीदार) : भागवत धर्म प्रसारक वारकरी सांप्रदाय, जूचंद्र यांच्या वतीने अधिक श्रावण मासानिमित्त ज्ञानेश्वरी पारायण व कीर्तन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पारायण संचालन पुरुषोत्तम म्हात्रे करत आहेत. या सोहळ्याचे उद्घाटन रघुनाथ म्हात्रे (बडमाळ), गोविंद पाटील (टिवरी), पुरुषोत्तम पाटील, रुक्मिणी म्हात्रे व विष्णू पाटील (कामण) यांच्या हस्ते करण्यात आले. या पारायण सोहळ्यात रोज स. ६.३० ते ७.३० वा. आरती, ७.३० ते १ वा. श्री ज्ञानेश्वरी पारायण, संध्या ५ ते ६.३० हरिपाठ, बालयोगी श्री सदानंद महाराज हरिपाठ संध्या. ६.३० ते ७.३० वा. आरती तसेच रात्री ८ ते १० वा. कीर्तन होणार आहे. भाविकांना रोज कीर्तनाची मेजवानी मिळणार आहे. यात प्रीती पाटील, नामदेव महाराज, नितीन वैद्य, सुधाकर किणी, अश्विनी म्हात्रे, पुरुषोत्तम महाराज यांच्या कीर्तनचा लाभ मिळणार आहे; तर शनिवारी (ता. २९) ५ वा. श्री ज्ञानेश्वरी ग्रंथ मिरवणूक व दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.