रायगड

रायगड
Published on

पेणमध्ये गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार
पेण, ता. २६ (बातमीदार) ः पेण एज्युकेशन सेवक सहकारी पतसंस्थेच्या ३६ व्या वार्षिक सभेमध्ये गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. एज्‍युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप पडळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्‍या कार्यक्रमात उपाध्यक्ष डॉ. देविदास बामणे, सचिव प्रवीण काळे व सर्व संचालक स्वीकृत सदस्य, विविध शाळांचे मुख्याध्यापक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला इर्शाळवाडीतील मृतांना श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली. यानंतर प्रास्ताविकात डॉ. बामणे यांनी, संस्थेच्या नफ्याबद्दल माहिती दिली. पतसंस्थेतर्फे शिष्यवृत्ती परीक्षा, दहावी, बारावी व इतर विभागात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांसह दिलीप पडळकर, विद्या घरत, प्रवीण काळे या शिक्षकांचा सत्‍कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी गीता म्हात्रे यांनी उपस्‍थितांचे आभार मानले.

-----------------

गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवा
खरेदी-विक्री संघाचे सभापती नीलेश थोरे यांची मागणी
माणगाव, ता. २६ (बातमीदार) ः मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून पावसामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. गणेशोत्‍सवात चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणात जात असल्‍याने तत्‍पूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवण्यात यावेत, अशी मागणी माणगाव तालुका शेतकरी खरेदी-विक्री संघाचे सभापती नीलेश थोरे यांनी केली आहे. मुंबई-गोवा महामार्गाची दरवर्षी पावसाळ्यात दैनावस्‍था होते. इंदापूर ते पळस्पे दरम्यान जागोजागी खड्डे पडल्याने वाहनचालकांना अक्षरशः कसरत करावी लागते. पावसाचे पाणी साचत असल्‍याने अंदाज येत नाही, त्‍यामुळे वाहने आदळून नादुरुस्‍त होत आहेत शिवाय चालक तसेच प्रवाशांच्या आरोग्‍याच्या व्याधी बळावल्‍या आहेत. महामार्गावर पडलेले खड्डे येणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी बुजवण्याची मागणी थोरे यांनी केली आहे.

---------------

पीक विमा काढण्यास ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ
माणगाव, ता. २६ (बातमीदार) ः जिल्‍ह्यात खरीप २०२३ ते रब्बी पिकाचा २०२५-२६ साठी पीक विमा काढण्याचा निर्णय राज्‍य सरकारने घेतला असून यासाठी चोलामंडलम जनरल इन्शुरन्स कंपनीची निवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ही अॅपद्वारे आपल्या पिकांच्या नोंदी सातबारा उताऱ्यावर ३१ जुलैपर्यंत करावी, याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले यांनी सूचना केल्‍या आहेत. यामध्ये भात पिकासाठी हेक्टरी रक्कम रुपये ५१,७६० रुपये इतकी आहे.
पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्याला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. यामध्ये पेरणी, लावणी, उगवण न होणे, परिस्थितीनुसार झालेले नुकसान, पेरणीपासून काढणीपर्यंत पिकाच्या उत्पादनात येणारी घट, नैसर्गिक आपत्ती, काढणीपश्चात नुकसान, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खेड, कीड रोग बाबींचा समावेश आहे. यासाठी शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात विमा हप्ता फक्त १ रुपया भरावयाचा आहे. राहिलेला हिस्सा अनुदान म्हणून राज्य सरकार भरणार आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तालुक्यातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

...................

भाऊसाहेब नेने महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण
पेण, ता. २६ (बातमीदार) ः भाऊसाहेब नेने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी पेणमधील मोतीराम तलाव परिसरात वृक्षारोपण करण्यात केले. कार्यक्रमाचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. सदानंद धारप यांच्या हस्ते झाले. तर संस्‍थेचे अध्यक्ष मंगेश नेने यांनी विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप केले. महाविद्यालयातून सकाळी विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.चिंच, बाभळ, वड, पिंपळ, जांभूळ, आवळा, करंज आदी रोपांची लागवड या वेळी करण्यात आली. वन अधिकारी अनिता टेमकर यांनी विद्यार्‍थ्‍यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास प्राध्यापक सुषमा खोत व प्राध्यापक विजया ठाकूर यांनी सहकार्य केले.

-----

शिघ्रेमध्ये एलसीबीचा छापा
अलिबाग, ता. २६ (बातमीदार) ः शिघ्रे येथील नवीवाडीतील गावठी हातभट्टीवर रायगडच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कारवाई करून १३ हजार रुपये किमतीची १३० लिटर दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी गोपाळवट व नागशेत येथील दोघांविरोधात मुरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवीवाडी येथे हातभट्टी गावठी दारूची विक्री सुरू असल्‍याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. त्‍यानुसार पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विशाल शिर्के, सहायक फौजदार दीपक मोरे, पोलिस नाईक सचिन वावेकर, शिपाई ईश्‍वर लांबोटे, स्वामी गावंड, ओमकार सोंडकर यांच्या पथकाने नवीवाडी येथे छापा मारून महादेव हिरवे यांच्याकडून आठ हजारांची तर दीपक मोरे यांच्याकडून पाच हजार रुपये किमतीचा दारू साठा जप्त केला.

------------------

घोटवळमधील ६० कुटुंबांना स्‍थलांतराच्या सूचना
माणगावमधील दरडप्रवण गावाची प्रांत, तहसीलदारांकडून पाहणी

माणगाव, ता. २६ (वार्ताहर) ः रायगड जिल्ह्यात इर्शाळवाडीतील दुर्घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला असून तालुक्यातील शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने, माणगाव उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप व तहसीलदार विकास गारूडकर यांनी तालुक्यातील पहेल, भांदरे, गारळ, घोटवळ, न्हावे, रेपोली या गावांतील दरडप्रवण भागाची पाहणी केली. यात इंदापूर विभागातील घोटवळ या गावातील जवळपास ६० घरांना दरडीचा धोका असल्‍याचे लक्षात येताच नागरिकांना स्थलांतराच्या सूचना केल्‍या आहेत. घोटवळ गावात १७० घरे असून लोकसंख्या एक हजाराच्या आसपास आहे. डोंगराच्या पायथ्‍याशी गाव वसले आहे. पावसामुळे माती भुसभुशीत झाली असून डोंगरावरील मोठमोठे दगड, मातीचे ढिगारे, मुरूम खाली घसरून कुठेकुठे अडकून पडल्‍याचे दिसते. हे दगड अजून थोडे सरकले तर घरांवर पडून दुर्घटनेशी शक्‍यता आहे. आपत्ती काळात माणगावचे प्रशासन २४ तास तैनात कार्यरत असल्‍याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्‍थांना सांगितले.

माणगाव ः घोटवळ गावातील दरडप्रवण भागाची पाहणी करण्यात आली.
--------------------------

बामणोली सरपंचपदी सुवर्णा सकपाळ
माणगाव (वार्ताहर) ः तालुक्यातील बामणोली ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच सुवर्णा राजेंद्र सकपाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सोमवारी निवड जाहीर होताच समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत आनंद व्यक्‍त केला. निवडणुकीदरम्‍यान कोणत्याही प्रकारचा ताणतणाव निर्माण होऊ नये, यासाठी माणगाव पोलिस ठाण्याकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सरपंच स्नेहा खाडे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आल्‍याने त्‍यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्‍यामुळे रिक्‍त झालेल्या पदावर सोमवारी निवडणूक झाली. सुवर्णा सकपाळ यांनी एकमेव अर्ज आल्याने त्‍यांना बिनविरोध निवड झाल्‍याचे घोषित करण्यात आले.

माणगाव ः बामणोली सरपंचपदी सुवर्णा सकपाळ यांची बिनविरोध निवड झाली.

--------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.