दृष्‍टीक्षेप

दृष्‍टीक्षेप

Published on

एटीएम कार्ड अदलाबदलची करून वृद्धाची फसवणूक
अंधेरी (बातमीदार) ः एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका ६९ वर्षांच्या वृद्धाच्या एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढून फसवणूक करणाऱ्या आरोपीस बोरिवली पोलिसांनी अटक केली आहे. संभवकुमार कृष्णा आचार्य असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला स्थानिक न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. गुणवंतराय कांतीलाल मेहता हे वयोवृद्ध गृहस्थ बोरिवली परिसरात राहतात. शनिवारी सायंकाळी ते बोरिवलीतील एका एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी आले होते. या वेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने मदत करण्याचा बहाणा करून त्यांच्याकडील एटीएम कार्डची अदलाबदल केली. त्यानंतर त्यांच्या कार्डवरून ५७ हजार रुपये काढून फसवणूक केली होती. या प्रकरणी गुन्हा नोंद होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक निनाद सावंत यांच्या पथकाने तपासाला सुरुवात केली होती. एटीएम सेंटरसह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी गुन्हा करून पळून गेलेल्या संभवकुमार आचार्य याला काही तासांत दहिसर चेकनाका, राज पॅलेस बार परिसरातून चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत त्यानेच हा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी विविध बँकांची दहा एटीएम कार्ड, ५ हजार २१५ रुपयांची रक्कम आदी मुद्देमाल जप्त केला आहे.

सोशल मीडियावर महिलेची बदनामी
अंधेरी (बातमीदार) ः सोशल मीडियावर एका महिलेची माहिती, फोटो आणि तिचा मोबाईल क्रमांक टाकून विनयभंग केल्याचा प्रकार विलेपार्ले पश्चिम परिसरातून उघडकीस आला. याप्रकरणी जुहू पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत २३ वर्षीय तरुणाला बेड्या ठोकल्या. पोलिस अधिक तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आशीष प्रवीणभाई चावडा असे असून तो मूळचा गुजरातमध्ये राहणारा आहे. आशीष चावडा याला यापूर्वी विनयभंगाच्या गुन्ह्यात जुहू पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी अटक केली होती. या गुन्ह्यात तो जामिनावर सुटला होता. आशीष याने विलेपार्ले परिसरात राहणाऱ्या फिर्यादी महिलेला एका मोबाईल नंबरवरून कॉल केला. अनोळखी नंबर असल्याने महिलेने सदर नंबरकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा फोन आल्यानंतर मोबाईल नंबर कुठून मिळाला, याची चौकशी केली असता ग्रुपवरून घेतल्याचे आरोपी आशीषने सांगितले. त्यानंतर महिलेने सदर मोबाईल ब्लॉक केला आणि त्यानंतर अन्य दोन-तीन मोबाईलवरून तिला सतत कॉल येत होते. त्यानंतर एका सोशल मीडियाच्या अश्लिल साइटवर तिचा फोटो आणि मोबाईल क्रमांक टाकल्याने सदर महिलेने जुहू पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजीतकुमार वर्तक यांची भेट घेऊन त्यांना हा प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जुहू पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तांत्रिक माहितीवरून आशीष चावडा या २३ वर्षांच्या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. आशीषनेच या महिलेचा फोटो आणि मोबाईल क्रमांक व्हायरल केल्याची कबुली दिली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक आनंद झोटे करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दहिसरला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर येथे शिवसेनेच्या वतीने दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शाखा क्रमांक एकच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात शालांत परीक्षा तसेच उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या साडेतीनशे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक मुंबै बॅंकेचे संचालक अभिषेक घोसाळकर होते. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.