आदिवासी दिनी एक जिल्हा एक रॅली

आदिवासी दिनी एक जिल्हा एक रॅली

Published on

कासा, ता. २६ ( बातमीदार) : जागतिक आदिवासी दिनी, ९ ऑगस्ट रोजी पालघर जिल्ह्यात ''एक जिल्हा एक रॅली''चे आयोजन करण्यात आले आहे. पालघर जिल्ह्यातील २८ संघटनांनी एकत्रित येत संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण समिती पालघरतर्फे ही रॅली काढण्यात येणार आहे. याबाबत कासा येथील बिरसा मुंडा सभागृहात रविवार (ता.२३) रोजी सभा झाली. समान नागरी कायदा, पेसा पदभरती, मणिपूर हिंसाचार तसेच अमानवीय कृत्य व इतर सामाजिक विषयावर चर्चा झाली. मणिपूरचे राज्य सरकार व केंद्रातील मोदी सरकार विरुद्ध निषेध नोंदविण्यात आला.

एक जिल्हा एक रॅलीचा मार्ग बिरसा मुंडा चौक ते पालघर तहसीलदार कार्यालय असा असेल. प्रत्येक तालुक्यातील कार्यक्रमानंतर ''एक जिल्हा एक रॅल'' करिता पालघरला दुपारी १ वाजता एकत्रित यायचे ठरविण्यात आले. यावेळी विविध व्यवस्थापन कमिटी, आर्थिक नियोजन कमिटी इ. स्थापन करण्यात आल्या आहेत. स्टेज कमिटीत आमदार विनोद निकोले, काळूराम धोदडे, आमदार सुनील भुसारा, आमदार राजेश पाटील, आमदार श्रीनिवास वनगा तसेच संयुक्त आदिवासी हक्क संरक्षण समिती पालघरचे पदाधिकारी आहेत. अशी माहिती समितीचे सदस्य ऍड. विराज गडग यांनी दिली.

आदिवासी दिनानिमित्त शासनाला मागण्यांचे निवेदन दिले जाणार आहे. आदिवासींचा संविधानिक अधिकार नष्ट करणारा समान नागरी कायदा रद्द करा. जनगणनेत आदिवासींसाठी स्वतंत्र धर्म कॉलम असावा. जागतिक आदिवासी दिनी राष्ट्रीय सुट्टी घोषित करणे. जिल्ह्याच्या प्रत्येक तहसीलदार, पंचायत समिती कार्यालयात पेसा गाव यादी व नकाशा लावणे. मणिपूर अमानवीय कृत्याचा निषेध नोंदवून दोषींना त्वरित कठोर शासन करावा. आदिवासींचा धनगर आरक्षणाला विरोध असून सरकारने टीसचा अहवाल लवकर न्यायालयासमोर सादर करावा. पेसा पदभरती लवकर करावी. पालघर जिल्हा मध्यवर्ती ठिकाणी आदिवासी भवन व बिरसा मुंडा स्मारक याकरिता २५ एकर जमीन त्वरित मिळावी. पालघर येथे मंजूर झालेले सिव्हिल हॉस्पिटल चे काम लवकर पूर्ण करावे इ. मागण्या केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.