पालघरमध्ये शासकीय रुग्णालयाला मंजुरी

पालघरमध्ये शासकीय रुग्णालयाला मंजुरी

Published on

पालघर, ता. २६ (बातमीदार) : पालघर येथे शासकीय रुग्णालयासह वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. ४३० खाटांच्या रुग्णालयाचे बांधकाम झाल्यानंतर दोन वर्षांनी शासकीय वैद्यकीय विद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयोगाकडे अर्ज सादर करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. यामुळे जिल्ह्यासाठी सुसज्ज रुग्णालय मिळणार असल्याने रुग्णांची फरपट थांबवण्याची शक्यता आहे.

पालघर जिल्ह्यामध्ये नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयाकरिता आवश्यक जमीन महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागात राज्य मंडळाने मान्यता दिली. पालघर येथे सिडकोने दिलेल्या दहा एकर भूखंडामध्ये २०० खाटांचे रुग्णालय उभारणीचे काम सुरू आहे. या कामासाठी २०९ कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित २३० खाटांच्या रुग्णालयाच्या उभारणीसाठी व संलग्न प्रशासकीय इमारत, अधिकारी कर्मचारी आवास व विद्यार्थी वसतिगृहासाठी एकूण २५ एकर जागेची आवश्यकता आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात अतिरिक्त पंधरा एकर जागेचा शोध घ्यावा लागणार आहे. महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या बांधकामासाठी २१७ कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. इमारत आणि बांधकामासह अन्य खर्च धरून प्रत्येक महाविद्यालयासाठी ४८५ कोटी रुपयांचा सरकारने तात्त्विक मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची सोय झाली आहे.

आयुर्वेद रुग्णालयाचाही प्रस्ताव मंजूर
पालघर नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात आयुर्वेद रुग्णालयाचाही प्रस्ताव मंजूर झाला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या राष्ट्रीय आयुष अभियान प्रकल्पांतर्गत पालघर जिल्ह्यात ५० खाटांचे एकात्मिक आयुष आयुर्वेद रुग्णालय मंजूर झाले आहे. या रुग्णालयाच्या उभारणीसाठी सहा एकर जमिनीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारकडे पाठवण्यात आला आहे. रुग्णालयासाठी इमारत, निवासस्थान, साहित्य, उपकरणांसाठी १५ कोटींच्या निधीला सरकारने मान्यता दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.