ठाणे पट्टा

ठाणे पट्टा

कालानी समर्थक माजी नगरसेविकेचा भाजपात प्रवेश
उल्हासनगर, (बातमीदार) : ओमी कालानी समर्थक माजी नगरसेविका रेखा ठाकूर यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रदिप रामचंदानी हे उल्हासनगर जिल्ह्याचे अध्यक्ष होताच त्यांच्या नेतृत्वाखाली प्रवेशाचे हे पहिलेच यश मिळाले आहे.
रेखा ठाकूर या नामचीन शाळेत प्रिन्सिपल आहेत. त्या कट्टर कालानी समर्थक राहिल्या आहेत. त्यात टीम ओमी कालानी या संघटनेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. २०१७ मध्ये पार पडलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत टीम ओमी कालानीला चिन्ह मिळाले नव्हते. त्यामुळे त्यांच्या समर्थक उमेदवारांनी भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. कालानीचे अनेक समर्थक नगरसेवक पदावर निवडून आले होते. त्यामध्ये रेखा ठाकूर यांचाही समावेश होता.महानगरपालिका स्थापन झाल्यावर प्रथमच भाजपाला महापौर पदाचा मान मिळाला होता. पुढे काही कालानी समर्थक नगरसेवक हे महाविकास आघाडी सोबत गेले. त्यात रेखा ठाकूर यांचाही समावेश होता. तर काहींनी भाजपसोबतच कायम राहण्याचा निर्णय घेतला होता. रेखा ठाकूर या भाजपाच्या चिन्हावर निवडून आल्या असल्या तरी त्यांची ओळख ही कालानी समर्थक म्हणूनच राहिली होती. मात्र काल रविवारी आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उपस्थित राहिलेल्या रेखा ठाकूर यांनी जिल्हाध्यक्ष प्रदिप रामचंदानी यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला.
...................................
मुसारणे येथील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश
पडघा, (बातमीदार) : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वाडा तालुक्यातील मुसारणे येथील तरुणांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे यांच्या उपस्थितीत सचिन पाटील मांगाठणे यांच्या मार्गदर्शनाखाली मुसारणे ग्रामपंचायतीचे सदस्य गौतमी भाकरे, सुनील शेळके, स्वप्नील शेळके, दयांनद भोईर, रूपेश शेळके, अक्षय भोईर यांच्यासह २० तरुणांनी शिवसेना शिंदे गटात शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांच्या पडघा येथील जनसंपर्क कार्यालयात रविवारी प्रवेश केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी मदन वाकडे, योगेश पाटील, विलास पाटील, अजय मोरे, आमदार मोरे यांचे स्वीय सहाय्यक बाबासाहेब गोसावी उपस्थित होते.

.........................................
खर्डीत आरोग्य तपासणी शिबिर
खर्डी, (बातमीदार) : शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डी विभाग शिवसेना व खर्डीतील अनुराग हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी १५६ रुग्णाची तपासणी करण्यात आली. या शिबिरात बीपी, डायबेटीस यांचाही तपासण्या करण्यात आल्या. तळागाळातील जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी शिवसैनिकांनी कायम गोरगरीब जनतेच्या संपर्कात राहून शिवसेनेचे काम सुरू ठेवण्याचे आवाहन यावेळी रुपेश म्हात्रे यांनी केले. शिबिरात डॉ.रत्ना काळे यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुखविश्वास थळे, संपर्कप्रमुख रुपेश म्हात्रे, महिला जिल्हाप्रमुख रश्मी निमसे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष फारूक मेमन, तालुकाप्रमुख बाळा धानके, महिला तालुकाप्रमुख गुलाब भेरें, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शाकिर शेख, माजी जिप अध्यक्षा मंजुषा जाधव, सरपंच मंगला गावित, जेष्ठ नेते रघुनाथ कदम, माजी जिप सदस्य विठ्ठल भगत, अश्विनी वारघडे, समनव्यक मिलिंद देशमुख, तालुका विस्तारक गणेश राऊत, उपतालुकाप्रमुख भाई देहेरकर, प्रशांत खर्डीकर, डॉ.मकरंद काळे व डॉ.रत्ना काळे यांच्यासहित शाखा प्रमुख, गट प्रमुख, बूथ प्रमुख, महिला आघाडी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
..............................................................

प्रोत्साहन अनुदानासाठी संपर्क करण्याचे आवाहन
सरळगाव (बातमीदार) : जे शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित असतील त्यांनी माझ्यासी संपर्क करावा असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे. ज्या शेतक-यांनी शेतकरी सेवा सोसायटीमधून कर्ज घेतले आहे. त्यातील ज्या शेतक-यांनी वेळेत कर्ज फेडले आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान निधी शासनाने जाहीर केला होता. मात्र हे अनुदान शेतक-यांना मिळत नसल्याने शेतक-यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. मात्र आता राज्य शासनाने पावसाळी अधिवेशनात हे प्रोत्साहन अनुदान देण्याचे निश्चित केले आहे. या योजनेअंतर्गत ज्या शेतक-यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांनी माझ्या कार्यालयात किंवा शेतकरी सेवा सोसायटीकडे संपर्क साधावा असे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे.

..................................................

शहापुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
वासिंद, (बातमीदार) : आदिवासी उन्नती मंडळ, मुंबई यांच्यातर्फे शनिवारी (ता.२९) शहापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. शहापूर तालुक्यातील दहावीच्या ६२ व बारावीच्या ३८ अशा एकूण पहिल्या १०० गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, फोल्डर फाईल व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य दत्तात्रय किरपण यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य रवींद्र घोडविंदे,काशिनाथ तिवरे, भगवान जाधव, बाळा पाटील, उमेश कोंडलेकर, चंद्रकांत तारमळे, रवींद्र शेलार, रामचंद्र कशिवले, रमेश वनारसे, एकनाथ वेखंडे, उदय चंदे, अरुण पाटील, दिलीप भोपतराव, अनंत चौधरी, आर के.पाटील आदी मान्यवरांसह विद्यार्थी शिक्षक व पालक उपस्थित होते. यावेळी दत्तात्रय किरपण व रवींद्र घोडविंदे, काशिनाथ तिवरे, भगवान जाधव, कमल चोक्शी यांनी गुणवंत विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे कौतुक करून मार्गदर्शन केले. सुधाकर पाटील यांनी आदिवासी विकास मंडळाने ४० वर्षे केलेल्या कामांचा आढावा घेतला. सूत्रसंचलन रवींद्र भोईर व चंद्रकांत पाटील यांनी केले. डॉ. हरिश्चंद्र भोईर यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी भगवान वरकुटे, सदानंद जाधव, समीर अवसरे, सुधीर पाटोळे, प्रमोद पाटोळे, डॉ. हरिश्चंद्र भोईर, काशिनाथ कांबळे, भरत वेखंडे, स्वप्नाली ढमणे, अनंता हिरवा यांनी मेहनत घेतली.
..........................

नारळाचे झाड पडून घरांचे नुकसान
ठाणे, (बातमीदार) : कोपरीतील आनंद नगर परिसरात असलेल्या रघुनाथ पाटील चाळीतील घरांवर नारळाचे मोठे झाड पडून तीन घरांचे मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती विभागाकडून देण्यात आली. कोपरीतील पाटील चाळीवर झड पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल या विभागांनी धाव घेतली. त्या चाळीतील रूम नंबर १ ते ३ या घरांच्या छतावर ते झाड पडले असून छताचे पत्रे तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ते तिन्ही रूम एकाच मालकाच्या असून सद्यस्थितीत तेथे भाडोत्री राहत आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांचे मदतीने घरावरती पडलेले झाड कापून बाजूला करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

.......................
वसंत पाटील यांची सरपंचपदी बिनविरोध निवड

वज्रेश्वरी (बातमीदार ) : ग्रुप ग्रामपंचायत जुनांदूरखी-टेंभवली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक रविवारी (ता. ३०) दुपारी ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. या निवडणुकीत सरपंचपदासाठी वसंत कचरू पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची पीठासीन अधिकारी ए.पी. बडगुजर यांनी सरपंचपदावर बिनविरोध निवड जाहीर केली. वसंत पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांसह ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवनिर्वाचित सरपंच वसंत पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना सोबत घेऊन गावाचा विकास करण्याचे आश्वासन दिले आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य प्रेमनाथ भगत, वसंत पाटील, संजय पाटील, रोशना खरपडे, मनिषा पाटील, बारक्या सातवी, यशोदा मढवी, कल्पना घरत, दत्ता शिकारी, माजी सरपंच महेंद्र पाटील आदिसह जुनांरखी भवली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com