माजिवडा - वडपे मार्गावरील कोंडी फुटणार

माजिवडा - वडपे मार्गावरील कोंडी फुटणार

भिवंडी ता. ३१ (बातमीदार) : माजिवडा-वडपे दरम्यान होणाऱ्या दररोजच्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीत विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा देण्यासाठी येत्या आठ दिवसात संपूर्ण रस्त्यावरील खड्डे भरावेत. त्याचबरोबर सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत जड - अवजड वाहनांना बंदी घालावी, असे निर्देश केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयात दिले.

माजिवडा-वडपे महामार्गावरील खड्डे आठ दिवसात मास्टिकने भरण्याबरोबरच सकाळी ७ ते रात्री ११ पर्यंत जड-अवजड वाहनांना बंदी घालावी, पाईपलाईनच्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, खर्डी व नवी मुंबईत वाहनांसाठी होल्डिंग पॉईंट तयार करावेत, भिवंडीतील अंजुर दिवे येथे दोन ठिकाणी व पिंपळास फाटा, ओवळी खिंड येथे हाईट बॅरियर लावावेत.त्याचबरोबर माणकोली पूल व रांजणोली पूल येथे जड-अवजड वाहनांसाठी यू-टर्न तयार करावेत, असे महत्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आले. भिवंडी तालुक्यातील दापोडे येथील ट्रान्सफॉर्मर व मानकोली नाक्याजवळील पोल हटविण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचबरोबर गोदामांकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी संबंधितांशी समन्वय साधावा. तसेच जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्याबरोबर समन्वय ठेवून रस्ता दुरुस्तीची कामे तातडीने हाती घ्यावी, असे निर्देश पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भिवंडी महापालिका आयुक्त अजय वैद्य, पोलिस अधीक्षक (महामार्ग) मोहन दहिकर, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, पोलिस उपायुक्त (वाहतूक) विनय राठोड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विलास कांबळे आदींसह एमएसआरडीसी, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

अवजड वाहतूक बंद करण्याची सूचना
माजिवडा ते वडपे मार्गावर पावसाळ्यात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी काही वर्षांपूर्वी वाहतूक विभागाने अवजड वाहनांची वाहतूक दिवसा बंद केली होती. त्याच धर्तीवर आताही जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी, या संदर्भात अधिसूचना लवकर जाहीर करावी. खड्डे भरण्याचे काम वेगाने होण्यासाठी वेगवेगळ्या कंत्राटदारांची नियुक्ती करावी. माणकोली व रांजणोली उड्डाणपुलाखाली वळण मार्ग तयार करावेत. तसेच या सर्व कामांचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्याद्वारे नोडल अधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे, अशा सूचनाही कपिल पाटील यांनी दिल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com