‘स्पेशल २६’ची टोळी गजाआड

‘स्पेशल २६’ची टोळी गजाआड

नवी मुंबई, ता. ३१ (वार्ताहर): ऐरोलीत राहणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या घरातील रोख रकमेसह दागिने असा सुमारे ३५ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या टोळीतील ११ आरोपींना अटक करण्यात रबाळे पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून १२ लाख ७५ हजार रुपयांची रोख रक्कम, एक पिस्तूल, तसेच ६ काडतुसे पोलिसांनी जप्त केली असून या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
ऐरोली सेक्टर-६ मध्ये कुटुंबासह राहणारे कांतीलाल यादव वर्षभरापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. २१ जुलै रोजी यादव व त्यांची पत्नी घरात असताना, दुपारी पावणे तीनच्या सुमारास अॅन्टी करप्शनचे अधिकारी असल्याचे भासवून सहा व्यक्ती घरात घुसल्या होत्या. या टोळीने घराची झडती घेण्याचा बहाणा करून यादव यांच्या घरातील २५ लाख रुपयांच्या रोख रकमेसह विविध प्रकारचे दागिने व इतर ऐवज असा सुमारे ३५ लाख रुपये किमतीचा ऐवज लुटून नेला होता. मात्र, दोन दिवसांनंतर यादव यांनी रबाळे पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केल्यानंतर सीसी टीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने तपास सुरू केला होता. त्यानुसार पोलिसांनी गुह्यातील पुणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली व ठाणे विभागातून दीपक कविटकर (४७), नरेश मिश्रा (५२), रूपेश नाईक (४२), सिद्धेश नाईक (३२), मुस्तफा कल्लू भाई करंकाळी (४०), विजय बारात (४३), देवेंद्र चाळके (३२), किशोर जाधव (४७), जुल्फीकार वली महमद शेख (४३), वसीम मुकादम (३९) आणि आयुब बाबुला खान (५०) या ११ आरोपींना अटक केली आहे.
------------------------------
चित्रपटाच्या कथानकातून लुटीची कल्पना
या प्रकरणातील टोळीला ऐरोलीत राहणाऱ्या कांतीलाल यादव यांच्या घरात ८० कोटी रुपये असल्याची माहिती मिळाली होती. ही रक्कम लुटण्यासाठी अक्षय कुमारच्या ‘स्पेशल छब्बीस’ या चित्रपटाप्रमाणे अॅन्टी करप्शनच्या अधिकाऱ्यांची टीम तयार करून लूट केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या लुटीत सहभागी असलेल्या काही आरोपींना ईडीची कारवाई असल्याचे सांगून सोबत घेऊन जप्त केलेल्या रकमेतील ३ टक्के रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले गेले होते.
-------------------------------
या गुन्ह्यात अटक केलेल्या टोळीने ‘स्पेशल छब्बीस’या चित्रपटाच्या कथानकावरून हा गुन्हा केल्याचे तपासात आढळून आले आहे. अटक केलेल्या आरोपींवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आणखी काही आरोपींचा सहभाग असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
- विवेक पानसरे, पोलिस उपआयुक्त, परिमंडळ-१ नवी मुंबई

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com