मत्स्यसंवर्धनासाठी कृत्रिम भित्तिकांच्या निर्मितीवर भर

मत्स्यसंवर्धनासाठी कृत्रिम भित्तिकांच्या निर्मितीवर भर

भाईंदर, ता. १६ (बातमीदार) : समुद्रात नष्ट होत असलेल्या मासळीच्या प्रजाती, तसेच वाढत्या मासळी दुष्काळाचा मासेमारी व्यवसायावर अनिष्ट परिणाम होऊ लागला आहे. यासाठी विविध घटक कारणीभूत असले, तरी समुद्रातील माशांची प्रजननाची नैसर्गिक ठिकाणे नष्ट होणे, हेदेखील एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. यासाठी समुद्रात आर्टिफिशियल रिफ (कृत्रिम भित्तिके) निर्माण करण्याची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे. या पार्श्वभूमीवर उत्तनमधील मच्छीमारांना मार्गदर्शन करणारे शिबिर नुकतेच पार पडले.

समुद्रातील प्रवाळ, नैसर्गिक खडक ही माशांची प्रजननाची, अंडी घालण्याची, तसेच सुरक्षित निवाऱ्याची ठिकाणे आहेत. मत्स्योत्पादनात ही ठिकाणे फार महत्त्वाची असतात; परंतु विविध कारणांमुळे ही ठिकाणे नष्ट होत आहेत. पापलेट, सुरमई, घोळ या माशांसोबतच माशांच्या विविध प्रजाती समुद्रात विपुल संख्येने असतात; मात्र माशांचा नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याचा परिणाम म्हणून अनेक प्रजाती दुर्मिळ होऊ लागल्या आहेतच. शिवाय मासळीच्या साठ्यांवरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मच्छीमारांना मासळीचा दुष्काळासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर समुद्रातच किनाऱ्यापासून दोन किमी अंतरापर्यंत कृत्रिम भित्तिके तयार करण्याची आवश्यकता भासू लागली आहे. परदेशात असे प्रयोग यशस्वी ठरले आहेत. समुद्रातच मानवनिर्मिती कृत्रिम खडक, विशिष्ट आकाराचे ठोकळे अथवा अन्य रचना निर्माण करणे ही यामागची संकल्पना आहे. या ठिकाणांकडे मासे आकर्षित होतील, त्यांच्यासाठी अन्न, निवारा, प्रजनन, तसेच लहान जीवांच्या प्रसारासाठी जागा उपलब्ध होतील व सागरी जीवनाला चालना मिळेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सागरी मत्स्यसंशोधन संस्थेकडून मार्गदर्शन
चेन्नईच्या केंद्रीय सागरी मत्स्यसंशोधन संस्थेचे वैज्ञानिक जो किझा कुडन यांनी नुकतीच उत्तन येथील मच्छीमारांची भेट घेतली. माशांच्या प्रजाती वाढविण्याकरिता कृत्रिम भित्तिके व त्यांच्या फायद्यांबाबत कुडन यांनी मच्छीमारांना मार्गदर्शन केले. कृत्रिम भित्तिका उभारण्यासाठी मच्छीमारांनी जागा सुचवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी पालघर आणि ठाणे मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील, परवाना अधिकारी पवन काळे यांच्यासह उत्तनमधील विविध मच्छीमार संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

कृत्रिम भित्तिकांसाठी समुद्राचा तळ टणक व कमी गाळाचा असणे, तसेच सभोवतालचे पाणी कमी गढूळ असणे आवश्यक आहे. मुंबई ते पालघर भागातील समुद्रात होत असलेल्या प्रदूषणामुळे अशी ठिकाणे कमी झाली आहे; मात्र तरीदेखील या विषयावर सर्व मच्छीमार संस्था एकत्र येऊन लवकरच विचारविनिमय करतील व समुद्रातील काही जागांची निवड करतील.
- बर्नड डिमेलो,
कार्याध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com