

पनवेल, ता. १८ (बातमीदार) : मुंबई-गोवा महामार्गाचे काम संथगतीने चालू आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी बुधवारी (ता. १६) पनवेलमध्ये निर्धार मेळावा घेतला होता. त्यामध्ये सरकारला धडकी व दहशत बसेल असे आंदोलन करा, असे आवाहन राज ठाकरे यांनी या वेळी केले होते. यामुळे प्रेरित होऊन पनवेल व रायगडमधील मनसे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १८) मुंबई-गोवा महामार्गावर विविध ठिकाणी खड्ड्यांत वृक्षारोपण करून अनोखे आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी झाल्याने जवळपास शंभरपेक्षा जास्त मनसे कार्यकर्त्यांना रायगड व पनवेल पोलिसांनी ताब्यात घेतले.
गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्ग रखडला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने त्याचा नाहक त्रास नागरिक व वाहनचालक यांना सहन करावा लागत आहे. या रस्त्याचे काम तत्काळ करावे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासातून मुक्तता करावी, अशी मागणी वारंवार केली जात आहे. यासाठी अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार संघटना एकत्र येऊन निषेध व आंदोलने झाली. मात्र शासनाला जाग न आल्यामुळे मनसेनेदेखील यामध्ये उडी घेतली आहे. राज ठाकरे यांनी आदेश दिल्याने मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले व शुक्रवारी मुंबई-गोवा महामार्गावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिरढोण ते पेण-वडखळसह रायगड हद्दीत खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून आंदोलन केले. मनसे कार्यकर्त्यांनी टी-पॉईंटजवळील भारतीय राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
------------
आंदोलनामुळे वाहतूककोंडी
मनसेने आंदोलन केल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका बसला. आधीच संथ गतीने सुरू असलेली वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती रायगडचे अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. या कारवाईमध्ये पनवेल शहर पोलिसांनी जवळपास ४० पेक्षा जास्त अंदोलनकर्त्यांना अटक केली. तसेच रायगड पोलिसांनी विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत जवळपास ६० अंदोलनकर्त्या मनसे कार्यकर्त्यांना अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी अंदोलनकर्त्यांना नोटिसा देऊन सोडून दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.