महिलांसाठी तीन दिवस मोफत स्तन स्क्रिनिंग, कर्करोगमुक्त झालेल्यांचा सन्मान

महिलांसाठी तीन दिवस मोफत स्तन स्क्रिनिंग, कर्करोगमुक्त झालेल्यांचा सन्मान

स्तन कर्करोगाविरोधात सामाजिक लढा
महिलांसाठी आठवडाभर मोफत स्क्रिनिंग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २१ : जगभरातील महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढले असून त्या संदर्भात होणाऱ्या वारंवार जागरूकतेमुळे आता लवकरात लवकर निदान होण्याकडे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लक्ष केंद्रीत केले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, महिलांनी पाच पद्धतीने स्तन परिक्षण करून संभाव्य स्तन कर्करोगाचा धोका टाळता येईल. महिलांमध्ये स्वपरीक्षण, निदान आणि शेवटी उपचार यावर भर देण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी लढा पुकारला आहे. या अंतर्गत मुंबईत आठवडाभर मोफत स्तन स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. तसेच ज्या महिलांच्या स्तनात गाठ किंवा कोणतीही लक्षणे आढळल्यास महिलेला पुढच्या उपचारांसाठी डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जाईल. यासह एखाद्या महिलेला स्तन शस्त्रक्रियेची गरज पडल्यास तात्काळ संस्थेच्या सहकार्याने तिला मदत पुरवली जाणार आहे.
वांद्रे येथील ‘हेल्प युअरसेल्फ’ या संस्थेने स्तन कर्करोगासाठी पुढाकार घेतला असून सोमवारी (ता. २१) विविध डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला. महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत फार असून तृतीयपंथींमध्ये स्तन तयार होण्यासाठीचे जर हार्मोन्स असतील तर त्यांना भविष्यात कर्करोग होऊ शकतो. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला स्तन कर्करोगाविषयीची माहिती आणि मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे मत ‘हेल्प युअरसेल्फ’ संस्थेच्या संस्थापक ॲड. रुबिना रिझवी यांनी सांगितले.

मॅमोग्राफीसह एमआरआय मोबाईल व्हॅनची कल्पना-
वयाच्या चाळिशीनंतर प्रत्येक महिलेने स्तनाची मॅमोग्राफी चाचणी करणे आवश्यक असते, पण अनेकदा ती कुठे करायची, कशी करायची असे प्रश्न महिलांना सतावतात. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी लवकरच मॅमोग्राफीसह एमआरआयची अत्याधुनिक सुविधा असलेली मोबाईल व्हॅन मुंबईच्या नागरिकांसाठी सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव चांगला पर्याय असू शकतो, असे कॉस्मेटिक सर्जन आणि पद्मश्री पुरस्‍कार प्राप्त डॉ. अशोक गुप्ता यांनी सांगितले.
.....................................
स्क्रिनिंगसाठी आवाहन
मुंबईच्या उच्चस्तरीय, निन्मस्तरीय, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या प्रत्येक महिलेला २१ ते २६ ऑगस्ट या दरम्यान स्तन स्क्रिनिंग करून घेता येणार आहेत. ही सुविधा पूर्णपणे मोफत असून प्रत्येकाने या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे ट्रस्टी आणि टाटा रुग्णालयाचे माजी जनसंपर्क अधिकारी डॉ. सईद जाफरी यांनी केले आहे. पहिल्या दिवशी जवळपास २००० महिलांनी स्क्रिनिंगसाठी ऑनलाईन फॉर्म भरले आहेत. २०१९ मध्ये ‘हेल्प युअरसेल्फ’ या संस्थेची स्थापना झाली. कर्करोगासाठी विशेष पुढाकार घेऊन समाजाला त्याचा फायदा व्‍हावा यासाठी ही संस्था कार्यरत आहे.
....................................
दोन रुग्णालयांशी टाय-अप
दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्या नागरिकांच्या उपचारांसाठी मुंबईतील दोन रुग्णालयांशी टाय-अप केले जाणार आहे. कर्करोगाचे उपचार न पडवणाऱ्यांसाठी सांताक्रूझ पश्चिम येथील बेन्झ आणि चेंबूरच्या साई रुग्णालयांशी टाय-अप केला जाईल. यासह मुख्यमंत्री सहायता निधीतूनही उपचारांचा खर्च केला जाणार आहे. यासह काही रुग्णांचे उपचार मोफत केले जातील.
....................................
स्तन कर्करोगाचा प्रतिबंध कसा कराल
महिलांनी स्वत स्तन परिक्षण करावे.
पाच पद्धतीने स्तन परिक्षण करता येते.
चाळिशीनंतर मॅमोग्राफी करावी.
जीवनशैलीत बदल करावा.
स्तनात संशयित गाठ आढळल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
.....................................
शिर्डीत ५०० खाटांचे रुग्णालय
येत्या काही काळात शिर्डीत ५०० खाटांचे रुग्णालय सुरू होणार असून फक्त कर्करोगाने ग्रस्त रुग्णांवर तिथे उपचार केले जातील. त्यातून टाटा रुग्णालयाचा वाढता भार कमी होण्यास मदत होईल, अशी आशा व्यक्त केली गेली.
...................................
कर्करोगमुक्तांचा सन्मान
स्क्रिनिंगदरम्यान डॉक्टरांसह वेगवेगळ्या क्षेत्रांतून संस्थेला मदत करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याचसोबत ज्यांनी स्तनाच्या कर्करोगातून मुक्तता मिळवली आहे अशा ‘पहिले माझे कर्तव्य फाऊंडेशन’च्या संस्थापक नयना कनाल आणि त्यांच्या सदस्यांचाही गौरव केला गेला.

ऑन्कोसर्जन डॉ. संदीप बिपटे यांनी आपल्याला जगण्याची नवी उमेद दिल्याचे सांगत जर जगण्याची इच्छा असेल तर कोणताही आजार हरवू

शकत नाही, असे नयना कनाल यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com