अन् तो बनला कुपोषित मुलांसाठी अन्नदाता

अन् तो बनला कुपोषित मुलांसाठी अन्नदाता

बदलापूर, ता. ११ (बातमीदार) : बदलापुरातील मार्शल नाडार हा ३० वर्षीय युवक २५० ते ३०० बालकांचा अन्नदाता झाला आहे. द युथ ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट व अम्मू केअर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मार्शल व त्याचे सहकारी, बदलापूर-अंबरनाथमधील आदिवासी पाड्यांतील जवळपास तीनशे मुलांना पौष्टिक व गरम जेवण खाऊ घालत आहेत. तसेच बदलापूर ते शहाड परिसरातील बेघर निवाऱ्यात राहणाऱ्या जवळपास दीडशे नागरिकांना अन्नदानाचे कामदेखील हे तरुण करीत आहेत.

बदलापूर पूर्व शिवाजी चौक परिसरात राहणाऱ्या मार्शल नाडार या युवकाला शाळेत असल्यापासूनच समाजाप्रती, समाजातील दुर्लक्षित राहिलेल्या घटकांसाठी आपुलकी आणि त्यांच्याप्रती काही तरी करण्याची भावना होती आणि याच भावनेतून त्याने आदिवासी पाड्यातील लहान मुलांना मोफत शिक्षण देण्याचे ठरवले. त्याच्या या विचारात त्याला त्याच्या काही मित्रांनी साथदेखील दिली आणि मग मार्शलने सावरेवाडी येथील आदिवासी मुलांना शिक्षण द्यायला सुरुवात करण्याचे ठरवले. हे काम करीत असताना त्याला कुपोषित मुलांची समस्या स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे त्याने थोडे थोडे पैसे जमा करून या मुलांना स्वतः खिचडी बनवून देऊन खाऊ घालायला सुरुवात केली. घरातून सुरुवातीला या कामासाठी विरोध झाला; मात्र मार्शलचे काम पाहून तेदेखील मार्शलला मदत करत आहेत.

अतुल चौधरी आणि रतूल गुनिया या सहकाऱ्यांचे त्याला या कामात सहकार्य लाभले. याच प्रयत्नातून पुढे द यूथ ऑफ टुडे चॅरिटेबल ट्रस्ट व अम्मु केअर चॅरिटेबल ट्रस्ट उभे राहिले. या ट्रस्टच्या माध्यमातून बदलापूर आणि अंबरनाथ या परिसरातील मिरची वाडी, आंबेवाडी, प्रकाश नगर व बदलापूर येथे डोंगरशेत, कवट्याची वाडी व तलावाची वाडी येथील लहान कुपोषित मुलांना अन्नदान केले जाते. आताच्या घडीला तीनशे ते साडेतीनशे आदिवासी मुलांना रोज एकवेळचे पौष्टिक जेवण ‘अम्मास खाना किचन’च्या माध्यमातून पुरवले जाते. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, शहाड या पट्ट्यातील बेघर निवारा केंद्रांतील नागरिकांनादेखील एकवेळचे जेवण दिले जाते.

मार्शलने पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर विधीची पदवीदेखील प्राप्त केली आहे. मार्शल व त्याचे सहकारी रोज सायंकाळी पाड्यातील मुलांना शिक्षण देतात. तसेच द युथ ऑफ टुडे चॅरिटेबल ट्रस्टमधील कोमल भागवत, ममता वर्दे, पूजा सिंग, प्रियांका पुजारी मुली आदिवासी महिलांना शिक्षणाचे धडे देत आहेत. तसेच या महिलांना शासकीय योजनांची माहिती दिली जाते, तसेच सॅनिटरी पॅडचे मोफत वाटप केले जाते. आजच्या घडीला या ट्रस्टमध्ये मार्शलसोबत अतुल, रतुल, पूजा, प्रियांका, कोमल, ममता यांशिवाय आदित्य आगावणे, सुशील चतुर्वेदी, रोहोबिम, हिमांशू अगरवाल, अजित गुप्ता हे युवक काम करत आहेत. अन्न व ज्ञानदानाशिवाय शहरातील नदी-तलाव असे निसर्गाने दिलेल्या स्रोतांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या सफाईची जबाबदारीदेखील या ट्रस्टच्या माध्यमातून घेण्यात येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com