सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे निषेध आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १५ : सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर नियमबाह्य काम करून घेण्यासाठी दबाव आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तसेच मारहाणीसह दमबाजीला बळी पडावे लागले आहे. अशा मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टींपासून सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या कायद्यामधील तरतुदी कमी करण्याच्या राज्य शासनाच्या कृतीविरुद्ध शुक्रवारी (ता. १५) महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यभर निषेध दिन पाळला होता. महासंघाच्या आवाहनानुसार अधिकारी महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीने यासंबंधीचे निवेदन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
महासंघाच्या ठाणे जिल्हा समन्वय समितीच्या पदाधिकारी व सदस्यांनी निवेदनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांना दिली. प्रत्येक सरकारी अधिकारी-कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करीत असतो; परंतु नियमात न बसणारी कामे नियमबाह्यपणे करून घेण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर विविध क्षेत्रांतील बड्या व्यक्तींकडून दबाव आणण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. जे प्रामाणिकपणे आणि दबावाला बळी न पडता कामे करण्याचा प्रयत्न करतात, त्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना नाहकपणे समाजविघातक प्रवृत्ती असलेल्या व्यक्तींकडून मारहाण-दमबाजीला बळी पडावे लागते. अशा मानसिक खच्चीकरण करणाऱ्या गोष्टींपासून सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी भारतीय दंड विधान कलम ३५३ च्या अंतर्गत संरक्षण देणारा कायदा करण्यात आला होता. मात्र यासंदर्भात कलम ३५३ अन्वये प्राप्त तरतुदी काढून घेण्याचे षड्‍यंत्र रचण्यात आले असल्यामुळे भविष्यात अधिकारी-कर्मचाऱ्यांना नाहक मारहाण-दमबाजीचे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com