मूर्ती स्वीकृत केंद्रांकडे ठाणेकरांची पाठ

मूर्ती स्वीकृत केंद्रांकडे ठाणेकरांची पाठ

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २१ : दीड दिवसाच्या गणरायाला निरोप देताना ठाणेकरांनी कृत्रिम तलावांना पसंती देत पर्यावरणाला साथ दिली. असे असले तरी पर्यावरणाभिमुख गणेशोत्सवाचा सर्वप्रथम पायंडा पाडणारे ठाणेकर स्वीकृत केंद्राच्या बाबतीत अद्याप उदासीनच असल्याचे दिसून आले. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने ठाणे महापालिकेने दहा प्रभागांतील विसर्जन ठिकाणी उभारलेल्या स्वीकृत गणपती मूर्ती केंद्रांपैकी केवळ पारससिक येथे २०२ मूर्ती भाविकांनी सुपूर्द केल्या आहेत. या मूर्तींचे पालिकेच्या वतीने विधिवत विसर्जन करण्यात आले आहे.
ठाणे पालिका हद्दीमध्ये पंधरा वर्षांपासून पर्यारवरणपूरक गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. ठाणे तलावांचे शहर असले तरी मूर्ती विसर्जनानंतर होणारे प्रदूषण रोखण्यासाठी त्याला पर्यावरणाची जोड देत कृत्रिम तलाव ही संकल्पना पुढे आली. या संकल्पनेला ठाणेकरांनीही भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे या वर्षी कृत्रिम तलावांची संख्या वाढवून ती चाळीशीपार नेण्यात आली. दुसरीकडे मूर्ती स्वीकृती केंद्र उभारून नवीन आदर्शही ठाणे पालिकेने पुढे ठेवला, पण पर्यारवणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या ठाणेकरांचा अद्यापही या केंद्रांना हवा तितका प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गेल्या वर्षीप्रमाणे या वर्षीही स्वीकृत केंद्रांवर मूर्ती सुपूर्द करणाऱ्यांची संख्या नगण्य होती.
….
पर्यावरणपूरक विसर्जन
जवाहर बाग, कोपरी, वागळे, बाळकूम, मुंब्रा आणि पाचपाखाडी या सहा अग्निशमन दलाच्या अखत्यारित २२ तलाव व घाट या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. बुधवारी दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाच्या दिवशी विविध ठिकाणी सुमारे ११ हजार ९१० गणपतींचे विसर्जन झाले. यामध्ये ११ हजार ६९७ घरगुती, तर ११ सार्वजनिक गणपतींचा समावेश होता. याशिवाय शेकडो ठाणेकरांनी घरात पिंपात किंवा छोट्याशा हौदमध्येही विधिवत गणेशाचे विसर्जन केले.
…..
केंद्रांमध्ये शुकशुकाट
मढवी हाऊस, राम मारुती रोड, महागिरी कोळीवाडा, टेंभीनाका, जेल तलाव, देवदयानगर, कामगार रुग्णालय, किसननगर बस स्टॉप, मॉडेला चेक नाका, रिजन्सी हाईटस आझादनगर, लोढा लक्झेरिया- माजिवडा आदी ठिकाणी ठाणे महापालिकेने स्वीकृत मूर्ती केंद्रांची व्यवस्था केली होती. येथे विसर्जनाच्या दिवशी दुपारी बारा वाजल्यापासूनच स्वयंसेवी कार्यकर्ते हजर होते. पण एकही गणेशभक्त मूर्ती सुपूर्द करण्यासाठी फिरकला नाही. केवळ पारसिक घाट येथेच २०२ मूर्ती स्वीकृत झाल्याची नोंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com