मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

मुंबई-अहमदाबाद महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

कासा, ता. १३ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचपाडा येथे सेवा रस्ता अपूर्ण असल्याने अपघात घडत आहेत. महामार्ग प्रशासनाने महामार्गावर पूल व सेवारस्ते बांधले; पण अनेक ठिकाणी पूल आणि सेवारस्ते अरुंद तयार केले आहेत. यासाठी अनेक आंदोलने करूनही महामार्ग प्राधिकरणाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांनी शुक्रवारी महामार्गावर ‘रास्ता रोको’ आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांनी बऱ्हाणपूर रस्त्यावरच त्यांना रोखले. या वेळी त्यांच्याशी बोलणी करून सहा महिन्यांत अपेक्षित कामे सुरू करण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

चिंचपाडा येथे मुंबई मार्गिकेच्या बाजूलाच सेवारस्ता तयार केलेला आहे. अंडर पास पूलही लहान आहे. अवजड आणि मोठ्या गाड्या येथून जाऊ शकत नाहीत. हा रस्ता चिंचपाडा-नागझरी मार्गे बोईसर तारापूर येथे गुजरातहून येणाऱ्यांसाठी जवळचा आहे; अन्यथा २० किलोमीटरचा वळसा घेऊन चिल्हार फाट्याहून बोईसर एमआयडीसीमध्ये जावे लागते. स्थानिक स्वराज्य आंदोलन समितीमार्फत चिंचपाडा, बऱ्हाणपूर सेवारस्ता पूर्ण करावा, उड्डाणपूल मोठा करावा, सोमटा ते चिंचपाडा सेवारस्ता पूर्ण करावा, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे, महामार्ग प्राधिकरणाचे महाव्‍यवस्थापक सुमित कुमार, पालघर अप्पर तहसीलदार राम शेळके यांनी चर्चा करून सहा महिन्यांत या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला होता. यात कासा पोलिस ठाणे अधिकारी नामदेव बंडगर, विक्रमगडचे पोलिस अधिकारी एस. पारखे, महामार्ग पोलिस अधिकारी बाळू राठोड हे घटनास्थळी उपस्थित होते.
------
कोट
चिंचपाडा येथे सेवा रस्ता करण्यासाठी वीस दिवसांत अंदाजपत्रक पाठवतो. तीन ते चार महिन्यांत या कामाला सुरुवात होईल. येथील उड्डाणपूल मोठा बनवण्यासाठी जुना पूल तोडावा लागेल. याला एक ते दीड वर्ष लागेल. मंजुरी मिळाल्यावर नवीन पुलाच्या कामाला सुरुवात केली जाईल.
- सुमित कुमार, मुख्य व्‍यवस्थापक, महामार्ग प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com