नवरात्रोत्सवासाठी मेट्रो सज्ज

नवरात्रोत्सवासाठी मेट्रो सज्ज

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १३ ः नवरात्रोत्सवादरम्यान मुंबई मेट्रो मार्ग २ अ आणि ७ या मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत मेट्रो मार्ग २ अ च्या अंधेरी पश्चिम आणि मेट्रो मार्ग ७ च्या गुंदवली या स्थानकांवरून शेवटची मेट्रो ही रात्री १२:२० वाजता सोडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री तथा एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी मुंबईकरांसाठी अतिरिक्त सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवरात्रीत लाखो नागरिक घराबाहेर पडतात. त्यांचा प्रवास सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सुमारे १५ मिनिटांच्या अंतराने एकूण १४ अतिरिक्त फेऱ्यांचा समावेश असणार आहे. सध्या मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या कालावधीत सुमारे २५३ इतक्या फेऱ्या साडेसात ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. तसेच शनिवारी २३८ आणि रविवार २०५ इतक्या फेऱ्या ८ ते साडेदहा मिनिटांच्या अंतराने सुरू आहेत. या अतिरिक्त फेऱ्यांच्या कालावधीत मेट्रो मार्ग २अ वरील अंधेरी (पश्चिम) आणि मेट्रो मार्ग ७ वरील गुंदवली या स्थानकावर शेवटची मेट्रो ही रात्री १:३० वाजता पोहोचेल. अतिरिक्त सेवांमध्ये कामाच्या दिवशी २६७ सेवा; तर सुटीच्या दिवशी २५२ सेवा असतील.
...
नवरात्र उत्सवादरम्यान रात्री घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक व्हावा, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्याचा फायदा प्रवाशांना नक्कीच होईल आणि याअतिरिक्त सेवेमुळे मुंबईकरांना नवरात्र उत्सव उत्साहाने साजरा करता येईल. आतापर्यंत पर्यावरणपूरक अशा मेट्रोने सुमारे ५ कोटी नागरिकांनी प्रवास करून मेट्रोला नागरिकांनी पसंती दर्शविली आहे.
- एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मुंबईकरांना सुरक्षित आणि आरामदायक मेट्रो सेवा प्रदान करत आहोत. मुंबईकर नागरिक मेट्रोला पसंती दर्शवत असून मेट्रोच्या प्रवासी संख्येत दरमहा सरासरी पाच टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात आता अतिरिक्त सेवा सुरू करत असल्याने प्रवासी संख्येत नक्कीच वाढ होईल तसेच नागरीकांना या कालावधीत सुरक्षित आणि आरामदायक प्रवास अविरतपणे करता येईल.
- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com