

सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १५ : ‘मिसाईल मॅन’ म्हणून सुपरिचित असणारे थोर शास्त्रज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने नवी मुंबई महापालिकेने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. महापालिकेच्या शाळांतील सहा विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी आत्मचरित्र ‘अग्निपंख’ या पुस्तकातील दोन भागांचे अभिवाचन करत आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाचनांजली अर्पण केली.
आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या संकल्पनेतून नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील ॲम्फिथिएटर येथे आयोजित कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आदरांजली वाहिली. या अभिनव उपक्रमामध्ये दिवाळेगाव येथील पालिका शाळा क्र. ११७ मधील कावेरी राठोड, किमया कोळी, तन्मय कोळी; तसेच शिरवणे शाळा क्र. १०१ मधील मुस्कान अन्सारी, गोपाल गोस्वामी, प्रियंका नेटके या सहा विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या ‘अग्निपंख’ या आत्मचरित्रामधील ‘जडणघडण’ या पहिल्या प्रकरणातील दोन भागांचे अभिवाचन केले. डॉ. कलामांचे बालपण, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण या कालावधीतील आठवणींचा पट खुला केला. तसेच त्यांच्या वाटचालीतील अनुभवांचे वाचन विद्यार्थ्यांनी केला.
डॉ. कलामांच्या व्यक्तिमत्त्वाची सुरुवातीच्या काळातील जडणघडण श्रोते आणि अन्य विद्यार्थ्यांना तर कळलीच, शिवाय ‘पुस्तकांसारखा मित्र नाही’ या अनुभवसिद्ध वचनाचीही प्रचिती आली. या पुस्तकाचे दोन भाग ऐकून संपूर्ण पुस्तक वाचून मिळवण्याची इच्छाही मनात निर्माण झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या वेळी शिक्षण विभागाचे उपआयुक्त दत्तात्रेय घनवट यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले.
---------------------
मानाचा किताब
नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागातर्फे साहित्यप्रेमी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांमध्ये विद्यार्थिसंख्येनुसार २५० ते २५०० पुस्तकांचे ग्रंथालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्या ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना प्रत्येक आठवड्याला उपलब्ध असतील. एखाद्या विद्यार्थ्याने आठवडा पूर्ण होण्यापूर्वीच पुस्तक वाचून परत केल्यास त्यास लगेच दुसरे दिले जात आहे. अशा प्रकारे महिन्याभरात जास्तीत जास्त पुस्तके वाचणार्या विद्यार्थ्यांस त्या महिन्याचा ‘वाचनसम्राट’ तसेच ‘वाचनसम्राज्ञी’ हा किताब मानाच्या पट्ट्यासह दिला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.