एसआरएचे सर्वेक्षण पुन्हा रखडले

एसआरएचे सर्वेक्षण पुन्हा रखडले
Published on

सुजित गायकवाड, सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. २२ ः अनेक वर्षांपासून मरणयातना सोसणाऱ्या झोपडपट्टीवासीयांना एसआरए योजनेमुळे अच्छे दिन येणार होते. परंतु शिवसेना आणि भाजपमधील वादामुळे त्‍यास विलंब होत आहे. भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी पुनर्विकासामध्ये वापरण्यात येणाऱ्या एफएसआयला केलेल्या विरोधानंतर हे सर्वेक्षण थांबवल्याचे समजते. या प्रकल्पामुळे नवी मुंबईत शिवसेनेच्या शिंदे गटाची ताकद वाढणार असल्याने प्रकल्पाला विरोध होत असल्याची चर्चा वर्तुळात रंगली आहे.
२१ सप्टेंबरला चिंचपाड्यापासून बायोमेट्रीक झोपडपट्टी सर्वेक्षणाला सुरुवात झाली. त्‍यानंतर टप्प्याटप्प्याने गणपती पाडा, रामनगर, ईश्वरनगर, विष्णू नगर, यादव नगर, रबाळे भीमनगर, तुर्भे इंदिरानगर, हनुमाननगर या एमआयडीसीच्या जागेवरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण करण्यात येणार होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत होणाऱ्या विकासाकरिता दहा एफएसआय वापरणार असल्याचा दावा माजी मंत्री आणि आमदार गणेश नाईक यांनी केला आहे.
शहरातील पायाभूत सुविधा आणि पाणी पुरवठ्यावर अतिरिक्त ताण येणार असल्याची भीती नाईक यांनी अनेकदा व्यक्त केली आहे. परंतु राजकीय वर्चस्वाची भीती अधिक असल्याने त्यास विरोध होत असल्याचे बोलले जात आहे.
मुळात झोपडपट्टी पुनर्विकास ज्या भागात होत आहे, त्या भागात शिंदे गटातील शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांचे मोठे प्राबल्य आहे. त्यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे माजी नगरसेवक जगदीश गवते, बहादूर बिष्ट, सुरेश कुलकर्णी यांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनचा चांगला फायदा होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक गटातील माजी नगरसेवक नवीन गवते, विकास झंजाड, सुधाकर सोनवणे या नगरसेवकांना फायदा होणार आहे. मात्र यात शिवसेनेचे पारडे जड ठरण्याची शक्यता आहे. भविष्यात नाईकांची डोकेदुखी ठरण्याची भीती भाजपच्या पक्षश्रेष्‍टींनाही वाटू लागल्‍याने एसआरए योजनेचे सर्वेक्षण काही काळ थांबवण्याच्या तोंडी सूचना एका बड्या मंत्र्यानी दिल्याचे समजते आहे.


शिंदे गटाचे वाढते प्रस्थ
शिवसेनेचे शिंदे गटाचे नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांना २००९ आणि २०१४ ला विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. परंतु त्यांना झोपडपट्टी बहुल भागातून सर्वाधिक मते मिळाली होती. या मतांमुळेच चौगुले विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचले होते. परंतु घणसोलीपासून पुढे गेल्यानंतर आमदार गणेश नाईकांच्या बालेकिल्ल्यामुळे त्यांची काहीशी पिछेहाट झाली. आता या प्रकल्पामुळे चौगुलेंचे जनाधार वाढण्यास मदत होणार आहे. तसेच दोन वेळा चौगुलेंनी घेतलेल्या मेळाव्याला मिळालेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद पाहता, चौगुलेंचे प्रस्थ वाढत आहे. चौगुलेंसोबत शिवसेनेच्या शिंदे गटाची वाढणारी ताकदही भाजपला परवडणारी नाही.

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत होणाऱ्या विकासात दहा एफएसआय वापरणार आहे, असा दावा कोणत्‍या अभ्‍यासावरून केला आहे. १५ वर्षे आमदार, मंत्री, आणि महापालिका ताब्यात होती, तेव्हा झोपडपट्टीचा विकास का केला नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने प्रकल्प मार्गी लागत आहे तर त्‍यात आडकाठी होत आहे. नवी मुंबईत सिडको वसाहतींचा पुनर्विकास करताना जो एफएसआय वापरला जात आहे, तेवढाच आम्हाला हवा आहे.
- विजय चौगुले, नवी मुंबई जिल्हा प्रमुख, शिंदे गट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com