माथाड्यांच्या वाट्याला सेवानिवृत्तीनंतरही उपेक्षा

माथाड्यांच्या वाट्याला सेवानिवृत्तीनंतरही उपेक्षा
Published on

नवी मुंबई, ता. २८ ः आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या माथाडी कामगारांच्या वाट्याला सेवानिवृत्तीनंतरही उपेक्षा आली आहे. मुंबई लोखंड व पोलाद कामगार बोर्डातर्फे सेवानिवृत्तीनंतर दिल्या जाणाऱ्या वेतनात उपदानाच्या रकमेत वाटमारी केल्याची बाब उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय देऊनही बोर्डाने रक्कम दिली नसल्याने कामगार न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
कळंबोली येथील स्टील मार्केटमध्ये मुंबई लोखंड व पोलाद कामगार मंडळातर्फे माथाडी कामगार नियुक्त केले जातात. या माथाडी कामगारांना वेतनासोबत कामगार कायद्यातील सर्व भत्ते देणे अनिवार्य आहे, तरीसुद्धा लोखंड व पोलाद कामगार मंडळातर्फे माथाडी कामगारांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेत उपदानाचे पैसे लाटण्याचा प्रकार होत होता. याबाबतचा येथील सेवानिवृत्त कामगारांना संशय आल्यानंतर बोर्डाकडे उपदानाची पावती घेऊन तपास केला होता. या वेळी माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार केलेल्या कामावर मिळालेल्या उपदानाची रक्कम बोर्डाने कमी दिल्याचे माथाडी कामगारांच्या लक्षात आले होते. याप्रकरणी उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर माथाडी कामगार कायद्यात दिलेल्या उपदानाच्या सूत्रावरून सर्व सेवानिवृत्त माथाडी कामगारांना चुकीचे उपदान दिल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे १८ जुलै २०२३ रोजी उच्च न्यायालयाने माथाडी कामगार कायद्यात दिलेल्या सूत्रानुसार उपदान देण्याचे आदेश कामगार बोर्डाला दिले आहेत; मात्र निकाल देऊन अनेक महिने उलटून गेले तरी अद्यापही बोर्डाकडून कामगारांना फरकाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
-------------------------------
कायदा काय म्हणतो
कॅलेंडर वर्षाप्रमाणे बारा महिन्यांत त्या कामगाराने कोणत्याही दिवशी काम केले असेल, तर त्याची नोंदणी संपुष्टात आणल्यानंतर लगेचच त्या १२ महिन्यांत त्याने काढलेल्या एकूण वेतनाची रक्कम त्याने त्या महिन्यात प्रत्यक्षात काम केलेल्या दिवसांच्या संख्येने भागून जर त्याने १२ प्रक्रियेच्या महिन्यात अजिबात काम केले नसेल तर त्याने केलेल्या शेवटच्या काढलेल्या वेतनाला भागून निघेल ती रक्कम उपदान म्हणून देण्यात यावी, असा माथाडी कायदा आहे.
------------------------
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार लोखंड पोलाद बाजार समितीने सेवानिवृत्तीनंतरचे उपदान द्यायला पाहिजे. माथाडी कामगारांच्या १९७५ च्या कायद्यात दिलेल्या सूत्रानुसार आम्हाला उपदान रक्कम मिळायला हवी. नाही दिल्यास कोर्टाचा अवमान झाल्याची तक्रार आम्ही कोर्टात करू.
- वसंत तांबे, निवृत्त माथाडी कामगार
------------------------------
सर्वांना समान पद्धतीने उपदान दिले आहे. १९७५ पासून उपदान देत आहोत. २००१ ला सेवानिवृत्ती घेतली, परंतु त्या वेळेस लोखंड-पोलाद बाजार समितीने दिलेली उपदानाची रक्कम कमी होती. त्यामुळे त्यांच्याकडे माझी मूळ रक्कम देण्याची मागणी केली आहे.
- शामराव पवार, निवृत्त माथाडी कामगार
--------------------------------
कामगारांच्या उपदानाबाबत चूक झाली आहे. याबाबत आम्ही मंत्रालय स्तरावर कामगार आयुक्त देशमुख यांच्याकडेसुद्धा सांगितले आहे, परंतु अद्याप बोर्डाने त्यावर काही केलेले नाही.
- गुलाबराव जगताप, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन
-------------------------------
कोर्टात अनवधानाने लोखंड व पोलाद कामगार बोर्डातर्फे चुकीची माहिती व कागदपत्रे सादर करण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर आम्ही पुनर्विचार व पुनर्विलोकन याचिका दाखल केली आहे.
ः- दिनेश दाभाडे, चेअरमन, लोखंड व पोलाद कामगार मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com