डोंबिवलीत शुभेच्छांच्या कमानी जैसे थे

डोंबिवलीत शुभेच्छांच्या कमानी जैसे थे
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : दहीहंडीपासून दिवाळीपर्यंतचे सर्व सण-उत्सव सरले, तरी शहराच्या विद्रूपीकरणास हातभार लावणाऱ्या कमानी, पोस्टर अद्याप जैसे थे आहेत. डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात दिवाळीच्या शुभेच्छा देणारी कमान शिवसेना शिंदे गटाकडून लावण्यात आली होती. इतर अनेक ठिकाणच्या कमानी हटवण्यात आल्या आहेत; पण ही कमान का हटवली जात नाही, असा सवाल जागरुक नागरिक करत आहेत. या कमानीपासून हाकेच्या अंतरावर केडीएमसीचे विभागीय कार्यालय असून पालिका प्रशासनाचे याकडे अद्याप लक्ष गेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सण-उत्सवांत राजकीय पक्षांकडून शुभेच्छा देणारे बॅनर, पोस्टर, कमानी या मोठ्या प्रमाणात शहरात झळकतात. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी क्षेत्रात तर या कमानी आणि बॅनर्सला जणू उतच आला होता. दहीहंडी उत्सवापासूनच शहरात कमानी लागण्यास सुरुवात होते. या कमानी दसरा-दिवाळीपर्यंत कायम राहतात. त्यावरील शुभेच्छांचे फलक केवळ बदलत असतात.
मोठमोठ्या कमानींमुळे शहरात वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन कोंडी होत असते. कल्याणमध्ये एका कमानीमुळे गणपती विसर्जनात अडथळा निर्माण झाला होता. तसेच अवजड वाहनांना कमानींमुळे अडथळा निर्माण होतो. याविषयी दरवर्षी नागरिकांकडून ओरड होत असली, तरी पालिका प्रशासन व राजकीय पदाधिकारी यांना त्याचे काही देणेघेणे नसते. केवळ आपल्या नेत्यांचे मोठमोठे फोटो झळकवून त्यांना खूश करण्याकडेच या पदाधिकाऱ्यांचा कल दिसून येतो.
पूर्वेतील इंदिरा चौकात शिवसेनेची मध्यवर्ती शाखा असून या ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने ही कमान उभारण्यात आली होती. शहरातील इतर कमानी हटल्या; मात्र ही कमान हटवण्यात आलेली नाही. या इंदिरा चौकाच्या जवळच हाकेच्या अंतरावर केडीएमसीचे डोंबिवली विभागीय कार्यालय आहे; मात्र तरीही पालिका अधिकाऱ्यांचे या गोष्टीकडे लक्ष जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. इंदिरा चौक हा कायम वाहनकोंडीचा केंद्रबिंदू राहिला आहे. प्रभाग अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात येत नसली तरी केडीएमसीच्या नवनियुक्त आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड याकडे लक्ष देणार का? हे आता पाहावे लागेल.
….
वाहतूक कोंडीत भर
स्टेशन परिसर असल्याने मार्केट, रेल्वे स्थानक परिसरात जाण्यासाठी हा मुख्य रस्ता आहे. पूर्वेतून पश्चिमेकडे जाण्यासाठी कोपर पुलावरून जाणारी वाहने या मार्गावरून जात असतात. शिवाय, येथे मोठ्या प्रमाणात रिक्षा थांबे, टॅक्सी थांबे आहेत. जवळच केडीएमटीचा बसथांबा आहे. काही खासगी बसदेखील इंदिरा चौकात थांबत असतात. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ हा परिसर कोंडीचा मुख्य बिंदू होतो. असे असताना वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या या कमानीकडे मात्र कोणी लक्ष देत नसल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com