

भाईंदर, ता. २८ (बातमीदार) : केंद्र सरकारकडून मिरा-भाईंदरला १०० ई-बस मंजूर करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान ई बस सेवा उपक्रम अंतर्गत राज्यातील १४ शहरांसाठी १,२९० बस मंजूर करण्यात आल्या आहेत. त्यात शहरातील १०० ई-बसचा समावेश आहे. काही दिवसातच ही वाहने पालिकेच्या ताफ्यात येणार असल्याने नागरिकांचा पर्यावरणपूरक प्रवास होणार आहे.
केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व नागरी व्यवहार मंत्रालय अंतर्गत पंतप्रधान ई-बस सेवा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत देशभरातील प्रमुख शहरांना केंद्राकडून ई-बस देण्यात येणार आहेत. त्यासाठी सर्व राज्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. मिरा-भाईंदर महापालिकेनेदेखील १०० ई-बस मागणीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. देशातील ३८ शहरांकडून ३,३३२ ई-बसचे प्रस्ताव केंद्राकडे प्राप्त झाले. त्यानंतर केंद्रीय सुकाणू समितीची नुकतीच बैठक पार पडली. त्यात हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. महाराष्ट्रातील १४ शहरांना १,२९० ई-बस मंजूर करण्यात आल्या असून त्यात मिरा-भाईंदरच्या १०० ई-बसच्या प्रस्तावाचाही समावेश आहे.
कंत्राटदाराकडून चालक, कर्मचाऱ्यांची नियुक्ती
‘पंतप्रधान ई-बस सेवा’ उपक्रमासाठी केंद्र सरकारकडून ई-बस खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी सीईएसएल या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. निविदा प्रक्रियेद्वारे कंत्राटदारांची नियुक्ती केली जाणार आहे. हे कंत्राटदारच विविध शहरांमध्ये जीसीसी तत्त्वावर ई-बस चालविण्याचे काम करतील. कंत्राटदाराकडून बस चालविण्यासाठी चालक व अन्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. त्याचप्रमाणे ई-बसची देखभाल दुरुस्तीही केली जाईल.
बस चालवण्यासाठी निधी
मिरा-भाईंदरला मिळणाऱ्या ई-बससाठी महापालिकेला वाहक नेमावा लागणार असून तिकिटाचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ई-बस चालविण्यासाठी केंद्र सरकारकडून नियमित लांबीच्या बससाठी प्रती किमी २४ रुपये, मध्यम आकाराच्या बससाठी प्रती किमी २२ रुपये व छोट्या बससाठी प्रती किमी २० रुपये महापालिकेला मिळणार आहेत. उर्वरित पैसे महापालिकेला तिकीट उत्पन्नातून व स्वनिधीमधून खर्च करायचे आहेत. त्यामुळे महापालिकेची मोठी आर्थिक बचत होणार आहे.
महापालिकेकडून ५७ ई-वाहनांची खरेदी
महापालिकेच्या ताफ्यात सध्या डिझेलवर चालणाऱ्या ७४ बस आहेत. प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत असल्याने महापालिकेने ५७ ई-बस याआधीच खरेदी केल्या असून त्यातील पाच ई-बस सेवेत अलीकडेच दाखल झाल्या आहेत. महापालिकेला परिवहन सेवेचा विस्तार करायचा आहे.
अडीचशे बसची आवश्यकता
येत्या एक ते दोन वर्षांत शहरात मेट्रो धावू लागणार आहे. त्यामुळे मेट्रो स्थानक ते शहरातील विविध भागापर्यंत बस सेवा महापालिकेकडून दिली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या परिवहन सेवेत अडीचशे बसची आवश्यकता आहे. आता केंद्राकडून १०० ई-बस मंजूर झाल्याने परिवहन सेवेची ही गरज भरून निघणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.