

ठाणे, ता. २८ (बातमीदार) : जीवनभर लोककलांचा जागर करीत आपल्या कार्यक्रमांद्वारे रसिकांना जणू आनंदाची अद्वितीय पर्वणी देणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा १३ वा ‘मृदगंध पुरस्कार’ सोहळा ठाण्यात रंगला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा या सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या आठवणीत १३ वा मृदगंध पुरस्कार सोहळा ठाणे येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे पार पडला. या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, गायक नंदेश उमप, माजी महापौर नरेश म्हस्के, गीतकार संदीप खरे, संगीतकार सलील कुलकर्णी, सरिता उमप यांच्यासह मनोरंजन विश्वातील अनेक मान्यवर उपस्थित होते. फाऊंडेशनचे अध्यक्ष नंदेश उमप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
मृदगंध पुरस्कार विजेत्यांमध्ये संगीत क्षेत्रातील कामगिरीसाठी गायक सुदेश भोसले, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अनुराधा भोसले, लोककलेतील कलावंत आतांबर शिरढोणकर, अभिनय क्षेत्रात उत्तम ठसा उमटवणारे अभिनेता सुमित राघवन, अभिनेत्री चिन्मयी सुमित, नवोन्मेष म्हणून गायिका केतकी माटेगावकर यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
अनुराधा भोसले यांनी ऊसतोड कामगार, बालकामगार आणि शाळाबाह्य मुले यावर आपले अनुभवांचे कथन केले. त्या म्हणाल्या, की गेली तीस वर्षे शाळाबाह्य मुले, बाल कामगार, बाल भिक्षेकरी या मुलांना शिकवण्याचे काम करत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात जवळपास अडीच लाख कुटुंबे ऊस तोडायला आणि वीटभट्टीवर येतात. त्यांचे जगणे पाहून स्वातंत्र्य मिळायचे आहे असे वाटते. यावर उदय सामंत यांनी पुढील १५ दिवसांत सर्व उद्योजकांची बैठक घेऊन बालकामगारांचा प्रश्न मार्गी लावला जाईल असे आश्वासन दिले. या वेळी ‘आयुष्यावर बोलू काही’ या संदीप खरे आणि सलिल कुलकर्णी यांच्या सदाबहार कार्यक्रमाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
……
आम्ही पण कलाकार : सामंत
उदय सामंत म्हणाले, आम्ही पण कलाकार आहोत. आमचा पिक्चर तुम्ही पंधरा महिन्यांआधी पाहिलाच असेल. मुंबई बाय गोवा टू सुरत या पिक्चरचे दिग्दर्शक, निर्माते सगळे ठाणेकर आहेत. तुम्ही तीन तास मेकअप करता; मात्र आम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मेकअपमध्ये असतो. त्यामुळे आम्ही किती कलाकार आहोत याची प्रचीती फक्त महाराष्ट्रालाच नाही आली, तर संपूर्ण देशाला आली आहे.
…..
मी अभिनयाचे कोणतेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले नाही. मी चुकून या क्षेत्रात आलो आहे. ज्यांच्या कार्याला मी मानतो, त्या लोकशाहीर विठ्ठल उमप या लोककलावंतांच्या नावाचा पुरस्कार आजच्या दिवशी मिळाला हे माझे भाग्य मानतो. नट म्हणून काही भूमिका आपण विसरतो, पण काही भूमिकांचा माणूस म्हणून माझ्यावर परिणाम झाला आहे. नट म्हणून तुमच्यात माणुसकीचा ओलावा जागृत राहिला पाहिजे; अन्यथा तुम्ही फक्त कोरडे नट राहता.
- दिलीप प्रभावळकर, ज्येष्ठ अभिनेते
….
पुढचा पुरस्कार सोहळा रत्नागिरीत
विठ्ठल उमप हे लोककलेचे विद्यापीठ असल्याचे मत उदय सामंत यांनी व्यक्त केले. तसेच पुढील १४ वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृतीसंगीत समारंभ रत्नागिरीमध्ये होईल असे त्यांनी जाहीर केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.