

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली/ठाणे, ता. २८ : मानपाडा पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्यांच्या खुर्चीत बसून रिल बनवत व्हायरल करणारा, अग्निशस्त्र जवळ बाळगत सार्वजनिक ठिकाणी दहशत पसरवणाऱ्या ठाकुर्लीच्या कथित बादशहाला ठाणे खंडणीविरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. सुरेंद्र पाटील (वय ५०) याला पोलिसांनी खंबाळपाडा येथील टाटा नाका परिसरात सापळा रचून अटक केली. त्याच्या चौकशीत बनावट नोटांच्या अयशस्वी झालेल्या डिलिंग आणि लुटीच्या घटनेचा उलगडा झाला. या प्रकरणी सुरेंद्र पाटीलसह इतर चार जणांवर मानपाडा पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अटक केलेला आरोपी सुरेंद्र पाटील (वय ५०, रा. चोळेगाव डोंबवली पूर्व) हा बांधकाम व्यावसायिक आहे. ठाणे खंडणीविरोधी पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन बेकायदा पिस्तुलासह आणि सात जिवंत काडतुससह रविवारी (ता. २६) त्याला अटक केली. त्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक चौकशीत मिळालेल्या माहितीनुसार त्याला चलनातील ४० लाखांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात बनावट एक कोटी ६० लाख रुपये मिळणार होते. बनावट नोटा घेण्यासाठी आरोपी सुरेंद्र ४० लाखांची रक्कम घेऊन मुरबाड येथील केपी फार्महाऊसवर गेला होता. बनावट नोटांच्या डिलिंगमध्ये दगाबाजी होऊ नये यासाठी तो सोबत दोन विनापरवाना पिस्तूल घेऊन गेला होता. दरम्यान, फार्महाऊसवर बनावट नोटा देणाऱ्या लोकांची वाट पाहत असतानाच अचानक पाच लोकांनी फार्महाऊसवर धाड टाकली. त्यांनी पोलिस असल्याचे सांगून छापेमारी करीत ४० लाखांची रक्कम घेऊन पोबारा केला.
--------------------
अटक केलेले आरोपी
आरोपी सुरेंद्रने दिलेल्या माहितीवरून ठाणे खंडणीविरोधी पथकाने ४० लाखांची लूट करणाऱ्या चार आरोपींना भिवंडी परिसरातून अटक केली. आरोपींमध्ये स्वप्नील दशरथ जाधव (वय २६) अक्षय तुकाराम गायकवाड (वय ३०, दोघेही रा. आनगाव, भिवंडी), आदेश मोतीराम भोईर (वय ३५, रा. महापोली, भिवंडी) आणि सचिन बबन जाधव (वय ३५, रा. वाडा, पालघर) यांचा समावेश आहे. सर्व आरोपींना पोलिसांनी न्यायालयात नेले असता त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.