भाजीपाल्यावर सांडपाण्याचा मारा

भाजीपाल्यावर सांडपाण्याचा मारा
Published on

खारघर, ता. २८ (बातमीदार) : खारघर वसाहतीत सांडपाण्याचा निचरा होत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. त्यातच आता खारघर सेक्टर आठ आणि दहालगत असलेल्या मोकळ्या जागेत आणि रेल्वे रुळालगत भाजीपाला पिकवण्यासाठी सांडपाणी अडवून मळे तयार केले जात आहेत. भाजीपाला पिकवण्यासाठी अस्वच्छ आणि दूषित पाणी वापरले जात असूनही सिडको आणि पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने संतापाचे वातावरण आहे.
खारघर रेल्वेस्थानकालगत आणि सेक्टर आठ आणि दहा खाडीकिनाऱ्याच्या मोकळ्या जागेत काही भाजीचे मळे आहेत. हा भाजीपाला पिकवण्यासाठी खाडीचे पाणी वापरले जात असल्याचे दाखवून प्रत्यक्षात मात्र मलमिश्रित सांडपाणी आणि गटाराच्या पाण्याचा वापर होत आहे. भाजी पिकवण्यासाठी तसेच धुण्यासाठी सांडपाणी वापरले जाणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूपच घातक आहे. त्याचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी पिकवलेली भाजी पनवेल, नवी मुंबई आणि मुंबई आदी विभागांत विक्री करण्यात येते. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेचे पहिले कर्तव्य आहे. मात्र, पालिका प्रशासन डोळेझाक करत असल्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पालिका आणि सिडको प्रशासनाने संबंधित व्यक्तींवर कारवाई करून त्यांचे इंजिन जप्त करावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

आठ ते दहा इंजिनचा वापर
खारघर वसाहतीमधील सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सिडकोने जवळपास ३० फूट खोल सांडपाणी वाहिनी सेक्टर दहालगत असलेल्या खाडीशी जोडली आहे. विशेष म्हणजे दूषित आणि मलमिश्रित सांडपाणी अडवून ते इंजिनद्वारे भाजीपाला पिकवण्यासाठी दिले जात आहे. परिसरात असे आठ ते दहा इंजिनचा उपयोग केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

जागा सिडकोची, भाडे मात्र स्थानिकांना
खारघर सेक्टर आठ, दहा आणि खारघर रेल्वेस्थानकालगत जवळपास २०० एकरहून अधिक सिडकोची जमीन आहे. या ठिकाणी भाजी पिकवणारे शेतकरी परप्रांतीय आहेत. एक, दोन-दोन एकर शेतीसाठी स्थानिकांकडून ५० ते ६० हजार रुपये भाडे आकारले जाते. हा व्यवसाय सप्टेंबर ते जून महिन्यापर्यंत सुरू असतो. भाजीपाला व्यवसायातून चांगले पैसे मिळत असल्यामुळे जवळपास ४० ते ५० परप्रांतीय व्यक्ती हे काम करत आहेत. शेतीची मशागत करण्यासाठी आधुनिक यंत्राचा वापर करत आहेत. विशेष म्हणजे स्थानिक नागरिकांचा पाठिंबा असल्यामुळे हा व्यवसाय अनेक दिवसांपासून सुरू आहे.

दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?
खारघरमध्ये भाजी विक्रेत्याकडून चेंबरमध्ये लावण्यात आलेल्या इंजिनचे पाईप हे मुळाशी जोडलेले आहे. पाणी अडवण्यासाठी जाळीचा उपयोग केला आहे. जाळीला अडकणारे प्लास्टिक पिशव्या आणि कचरा काढण्यासाठी कामगार ३० फूट खोल वाहिनीत उतरतात. अशा वेळी घाई गडबडीत पाय घसरून खोल चेंबरमध्ये पडून जीवितहानी झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून विचार केला जात आहे.

खारघर रेल्वेस्थानकालगत आणि सेक्टर आठ व दहा खाडीकिनाऱ्याच्या मोकळ्या जागेत योग्य ती पाहणी करण्यात येईल. सांडपाण्यावर भाजीपाला पिकवला जात असल्यास पुढील कार्यवाही केली जाईल.
- प्रीतम पाटील, एसटीपी प्रमुख, पनवेल महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com