लोन ॲपच्या गुन्ह्यांमध्ये घट

लोन ॲपच्या गुन्ह्यांमध्ये घट
Published on

लोन ॲपच्या गुन्ह्यांमध्ये घट
यंदा केवळ ५१ गुन्‍हे दाखल; पोलिसांकडून जनजागृतीवर भर
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : गेल्‍या काही महिन्‍यांत ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. यामध्ये सर्वांत जास्‍त लोन अॅपचा सुळसुळाट झाला होता. या ॲपच्‍या माध्यमातून जलद कर्जाचे प्रलोभन दाखवून हजारो नागरिकांची फसवणूक करण्यात आली होती. त्‍यामुळे पोलिसांनी या लोन ॲपविरोधात विशेष मोहीम उघडली होती. हे ॲप चालवणाऱ्या कंपन्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती. त्‍यामुळे मुंबई पोलिसांच्‍या आकडेवारीनुसार गेल्या वर्षभरात नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत या वर्षी नोंदवलेल्या ऑनलाईन कर्ज फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे. कर्ज फसवणूकप्रकरणी सायबर गुन्हेगारांनी वेगवेगळ्या कार्यपद्धती अवलंबल्या असल्याचेदेखील पोलिस तपासात समोर आले आहे; मात्र अधिक जलदगतीने ही कारवाई होणे अपेक्षित असल्‍याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
मुंबईत गेल्या वर्षी पहिल्या दहा महिन्यांत ऑनलाईन लोन ॲपद्वारे फसवणुकीचे ९६ गुन्हे दाखल झाले होते; तर या वर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत ५१ गुन्हे दाखल झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. २०२२ च्या तुलनेत या वर्षी ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन कर्ज फसवणुकीच्‍या गुन्ह्यांत ४५ टक्‍के घट झाल्याचे दिसत आहे. आकडेवारीतून एकीकडे गुन्ह्यांमध्ये घट दिसत आली, तरी दुसरीकडे पोलिसांचे प्रकरण उकल करण्याचे प्रमाण फक्त सहा टक्‍के असल्याचे निरीक्षणात समोर आले आहे. शिवाय, या वर्षात केवळ पाच प्रकरणे सायबर पोलिसांना तडीस नेण्यात यश आले असून या प्रकरणांमध्ये ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी सर्व प्रकारच्या सायबर गुन्ह्यांसाठीचे या वर्षी पहिल्या नऊ महिन्यांत ३५६२ गुन्हे नोंदवले होते, परंतु त्यापैकी केवळ ५७७ प्रकरणे सोडवण्यात पोलिसांना यश आले. म्हणजे आकडेवारीनुसार १५ टक्के प्रकरणांची उकल पोलिसांनी केली आहे.
...........................
मुंबईत ऑनलाईन कर्ज फसवणूक प्रकरणे
२०२३ (जानेवारी ते ऑक्टोबर)
दाखल गुन्हे - ५१
तपास पूर्ण प्रकरणे - ११
अटक करण्यात आलेल्या व्यक्ती - ११

२०२२ (जानेवारी ते ऑक्टोबर)
दाखल गुन्हे - ९६
तपास पूर्ण प्रकरणे - ५
अटक करण्यात आलेल्या व्यक्ती - १६

२०२१ (जानेवारी ते डिसेंबर)
गुन्हे दाखल - ४२
तपास पूर्ण प्रकरणे - ०४
अटक करण्यात आलेल्या व्यक्ती - १४
...............................
गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी
कर्ज फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार खास कार्यपद्धतीने किंवा मोडस ऑपरेंडीने फसवणूक करतात. ज्या ॲपद्वारे फसवणूक केली जाते, अशा कर्ज देणाऱ्या अॅपची आरबीआयकडे अधिकृत नोंदणी केली जात नाही. ॲप किंवा वेबसाईटवर कर्ज देणाऱ्या कंपनीचा कार्यालयाचा पत्ता किंवा संपर्क माहिती उपलब्ध नसते. अशा कंपन्या फक्त ऑनलाईन विश्वात असतात. खास ऑफर देत प्रलोभन दाखवत हे गुन्हेगार कर्ज घेण्यासाठी इच्छुक ग्राहकांना आपले शिकार बनवतात. ग्राहकांच्या फोनवरील सर्व वैयक्तिक तपशील, विशेषत: संपर्क तपशिलांमध्ये ॲपद्वारे प्रवेश करतात आणि नंतर त्या माहितीचा दुरुपयोग करत ग्राहकांना ब्लॅकमेल केल्याच्यादेखील सायबर नोंदी आहेत.
...............................................
फसवणुकीचा बळी
- अशा एका ऑनलाईन कर्ज फसवणूक करणाऱ्या ॲपने मुंबईकरांचे काही काळात बळीसुद्धा घेतले आहेत. अशाच एका प्रकरणात या वर्षी मे महिन्यात ३८ वर्षीय संदीप कोरगावकर यांनी त्यांच्या मुंबईतील कुरार येथील राहत्या घरी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. संदीपला धमकावले जात होते आणि कर्ज फेडूनसुद्धा त्याचे फोटो मॉर्फ करून त्याचा छळ केला जात होता. त्यानंतर त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते. संदीपचे फोटो अश्लीलरीत्या मॉर्फ करून त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना पाठवण्यात आले. तसेच त्याच्या सहकाऱ्यांना फोन करून त्याची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले होते.
- संदीपप्रमाणे या वर्षी मार्चमध्ये एका ४३ वर्षीय महिलेने कर्ज फसवणूक आणि नंतर मानसिक छळामुळे आत्महत्या केली होती. मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे कर्ज घेतल्यावर पीडितेला फोन करून कर्जाची रक्कम द्या, नाही तर तिचे मॉर्फ केलेले फोटो तिच्या कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना पाठवू, अशी धमकी तिला देण्यात आली होती. अखेर कंटाळून महिलेने आपले जीवन संपवले. या प्रकरणात पोलिसांनी १३ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. तसेच २ आरोपींना अटक करण्यात आली होती.
...........................
काय करता येईल
इन्स्टंट लोन अॅप्सच्या विरोधात मुंबई सायबर पोलिसांनी सुरक्षेसंदर्भात काही उपाययोजना नागरिकांसाठी प्रसिद्ध केल्या आहेत.
- अॅप डाऊनलोड करण्यापूर्वी त्याची सत्यता तपासा.
- ऑफरच्या अटी आणि नियम तपासा.
- लिंक्स किंवा कोणतेही ऑनलाईन फॉर्म क्लिक करताना पडताळणी करा.
- पैसे मिळवण्यासाठी कोणतेही क्‍यूआर कोड कधीही स्कॅन करू नका.
- कर्ज अॅप्सवर तुमची केवायसी कागदपत्रे कधीही शेअर करू नका.
- काही आपत्ती घडल्यास हेल्पलाईन १९३० किंवा https://cybercrime.gov.in वर सायबर गुन्ह्याची तक्रार करा.
.........................................
प्रतिक्रिया
सायबर फसवणूक झाल्यावर पीडित व्यक्तीने पोलिसांना शक्य तितक्या लवकर माहिती देणे आवश्यक आहे; जेणेकरून प्रकरणाचा छडा लवकरात लवकर लावण्यास मदत होते. सायबर प्रकरणात केवळ ज्येष्ठ नागरिकच नाही, तर तरुणही सायबर फसवणूक करणाऱ्यांचे टार्गेट आहेत. आम्ही मुंबई पोलिस सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, रेडिओ चॅनेल्स, मीडिया हाऊसच्या माध्यमातून जनजागृती मोहीम करत आहोत. जिथे आम्ही नागरिकांना सायबर फसवणूक कशी टाळता येईल, याबद्दल माहिती देत आहोत.
- डी. एस. स्वामी, सायबर क्राईम, मुंबई पोलिस.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com