चौकडीचा आईस्क्रीमवाल्यावर सशस्त्र हल्ला

चौकडीचा आईस्क्रीमवाल्यावर सशस्त्र हल्ला
Published on

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ : ‘पुराना हिसाब बाकी है...’ ची धमकी देऊन रिक्षातून आलेल्या सशस्त्र टोळक्याने आईस्क्रीम विकणाऱ्या चौघांवर हल्ला केल्याची घटना डोंबिवलीत घडली आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडीत सोमवारी (ता. २७) मध्यरात्री १ च्या सुमारास ही घटना घडली आहे.
जखमी आईस्क्रीमवाला दिलू माली (वय ३५) याच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिलू माली याच्यासह त्याचे सहकारी नानालाल शंकरदास वैष्णव, कन्हैयालाल शंकरदास वैष्णव, विनोद बरदीचंद सेन आणि अमरचंद बालूराम साळवी हे संत नामदेव पथ रस्त्यावर असलेल्या वसंतवाडीत हातगाडीवर आईसक्रीम तयार करून विक्रीचा व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री व्यवसाय बंद करून हातगाडी साफ करण्याचे काम सुरू असतानाच तोंडाला मास्क लावलेले चार जण रिक्षातून उतरले. ‘इससे पुराना हिसाब बाकी है’, असे म्हणत रिक्षातून उतरलेल्या टोळक्याने लाकडी दांडक्यासह चाकूने हल्ला चढविला. तसेच लाथा बुक्क्यांनी चारही आईसक्रीमवाल्यांना बेदम मारहाण केली. आईसक्रीमवाल्यांनी या हल्ल्याला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोर सशस्त्र असल्याने ते घाबरले होते. त्यानंतर हल्लेखोरांनी रिक्षातून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार परिसरात लावलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com