माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक
चेंबूर, ता. २९ (बातमीदार) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, तथा माजी महापौर दत्ता दळवी यांना भांडुप पोलिसांनी आज अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दळवी हे २००५ ते २००७ या कालावधीत मुंबईचे महापौर होते. आक्रमक नेते म्हणून ते ओळखले जातात.
भांडुपमध्ये रविवारी (ता. २६) ईशान्य मुंबई, रत्नागिरी व सिंधुदुर्ग कोकणवासीयांचा जाहीर मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यातील भाषणादरम्यान दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अपशब्दाचा वापर केला. या प्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी विक्रोळी येथील राहत्या घरातून दळवी यांना अटक केली. तपासादरम्यान दळवी यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुद्ध दोन गटांत वैमनस्य पसरवणे, अपमान करणे आदी विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर दळवी यांना मुलुंड न्यायालयात हजर केले असता त्यांना १२ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
भांडुप, मुलुंडमध्ये तणाव
माजी महापौर दत्ता दळवी यांना अटक केल्याचे वृत्त पसरल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज भांडुप पोलिस ठाण्यासमोर मोठी गर्दी केली होती. कार्यकर्त्यांनी हातात शिवसेना पक्षाचा झेंडा घेऊन मुख्यमंत्री शिंदे, राज्य सरकारविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, आमदार सुनील राऊतही उपस्थित होते. त्यामुळे भांडुप पोलिस ठाणे आणि मुलुंड न्यायालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते.
मी जे बोललो ते मला आक्षेपार्ह वाटत नाही. मी वावगे काही बोललेलो नाही. कट्टर शिवसैनिक आहे. जेल वगैरे आमच्यासाठी काही नवीन नाही.
- दत्ता दळवी, माजी महापौर
दत्ता दळवी यांनी जो शब्द वापरला आहे तो ‘धर्मवीर’ चित्रपटात वापरला आहे. या न्यायाने चित्रपटातील कलाकारांवरही गुन्हा दाखल केला पाहिजे. पोलिसांनी एवढा मोठा फौजफाटा घेऊन मोठ्या गुन्हेगाराप्रमाणे दळवी यांना अटक केली. दळवी पळून जाणार होते का?
- संजय राऊत, खासदार, शिवसेना ठाकरे गट
शिवसेना ठाकरे गटाविरुद्ध हेतुपुरस्सर कारवाई सुरू आहे. आमच्या नेत्यांना जाणीवपूर्वक अटक केली जात आहे.
- सुनील राऊत, आमदार, शिवसेना ठाकरे गट
दळवी यांनी कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत. ते शिंदे गटात सहभागी होत नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर खोटे आरोप आणि खोटी तक्रार करून त्रास दिला जात आहे.
- अंजली परब, शिवसेना कार्यकर्त्या
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.