स्फोटामुळे उडालेले दगड स्वयंपाकघरात

स्फोटामुळे उडालेले दगड स्वयंपाकघरात

मनोर, ता. ४ (बातमीदार) : पालघर तालुक्यातील डेवणी पाडा येथील खाणीत उत्खननासाठी केलेल्या स्फोटातून उडालेला दगड लगतच्या राहत्या घरात पडून छताचे नुकसान झाले. या घटनेत नशीब बलवत्तर म्हणून स्वयंपाकगृहातील गृहिणी थोडक्यात बचावली. सहा वर्षांपूर्वी सुरुंग स्फोटातून दगड उडाल्याने खाणीलगतच्या शाळेच्या छताचे नुकसान झाले होते. बंद असलेल्या वर्गाच्या छतावर दगड पडल्याने लगतच्या वर्गातील विद्यार्थी बचावले होते. या घटनेची पुनरावृत्ती आता होत आहे.

दहिसर तर्फे मनोर गावातील डेवणी पाड्यातील दगड खाणीमधून दोन वर्षांपासून सुरुंग स्फोट करून दगड उत्खनन सुरू आहे. दगडाच्या उत्खननासाठी खाणीत उच्च क्षमतेचे सुरुंग स्फोट केले जात आहेत. सुरुंग स्फोटामुळे उडणाऱ्या दगडाचे तुकडे नागरिकांच्या घरांच्या छतावर पडत आहेत. खाणीपासून दहा मीटर अंतरावर जिल्हा परिषद शाळा असल्याने दगडाचे तुकडे छपरावर पडत असल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायतीसह मंडळ अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दगड खाणीतून सुरू असलेले सुरुंग स्फोट बंद करण्याच्या मागणीकडे महसूल विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. सुरुंग स्फोटांमुळे डेवणी पाड्यातील ग्रामस्थ, विद्यार्थी भीतीच्या छायेत असल्याने बेकायदा सुरुंग स्फोट करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी जोर धरत आहे.

गृहिणी थोडक्यात बचावली
दगड उत्खननासाठी रविवारी (ता. ३) दुपारी उच्च क्षमतेचा सुरुंग स्फोट करण्यात आला. या स्फोटात उडालेला दगडाचा मोठा तुकडा आदिवासी वस्तीमधील रोहित नोक्ती यांच्या राहत्या घरात जाऊन पडला. या वेळी स्वयंपाक घरातील गृहिणी थोडक्यात बचावल्याने मोठा अनर्थ टाळला आहे.

सुरुंग स्फोटातून उडालेल्या दगडाबाबत तक्रार प्राप्त झाली असून माहिती घेऊन कारवाई केली जाईल. शुक्रवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्यात आला. तहसीलदार कार्यालयात अहवाल सादर केला जाईल. दगड खाण बंद ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
- ज्योती वरहे, मंडळ अधिकारी, दहिसर तर्फे मनोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com