वसईत रंगणार संस्कृतीचा साज

वसईत रंगणार संस्कृतीचा साज
Published on

प्रसाद जोशी, सकाळ वृत्तसेवा
वसई, ता. २३ : ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्याने वसई परिसर सज्ज झाला आहे. घरोघरी आकर्षक विद्युत रोषणाई, ख्रिसमस ट्री, चांदण्या, आकाशकंदील यांसह अन्य पूर्वतयारी करण्यात आली आहे. चर्चना रंगरंगोटी करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व चर्चमध्ये विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

येशू ख्रिस्तांचा जन्म २५ डिसेंबरला झाला. त्यामुळे हा दिवस ख्रिस्ती बांधव ख्रिसमस (नाताळ) म्हणून साजरा करतात. येशूचा जन्म एका गोठ्यात झाला, मात्र त्यांनी जगाला मानवता व शांतीचा संदेश दिला. ख्रिस्ती बांधव त्याच विचारधारेवर आपले जीवन जगत असून वसई परिसरामध्ये संस्कृती, परंपरा कायम जपत आहेत. जगाला शांतीचा संदेश देणारे येशू यांनी मानवता धर्म जपला. त्यांच्या या विचारधारेला आजही ख्रिस्ती समाज जपत आहे. येशूचा जन्मोत्सव साजरा करताना सरत्या वर्षाला निरोप देत नववर्ष स्वागतापर्यंत सणाचा उत्साह असतो, याची जय्यत तयारी पालघर जिल्ह्यात केली आहे. गेल्या आठ दिवसांपासून शहरातील चर्चमध्ये साफसफाई, रंगरंगोटी, तसेच शोभेच्या वस्तूंनी सजावट करण्यात येत आहे. संस्कृतीचा साज व सर्वधर्मीय शोभायात्रा, सामाजिक एकोपा आणि जन्मोत्सवाच्या आनंद साजरा करण्यासाठी ख्रिस्ती बांधव सज्ज झाले आहेत.

नाताळनिमित्त विविध उपक्रमांसोबतच जनजागृती तथा सामाजिक प्रबोधनाचे देखावे करण्यात आले आहेत. वसईच्या माणिकपूर, रमेदी, गिरीज, निर्मळ, नंदाखाल, नानभाट, पापडी, उमराळे, पाचूबंदर व आजूबाजूच्या गावात चर्च मोठ्या प्रमाणात आहेत. नाताळ सणाला अनन्यसाधारण महत्त्व असून चर्च, घरोघरी रोषणाई, सामाजिक संदेश देणारी गोठा स्पर्धा पारंपरिक लाल लुगडे नेसलेल्या महिला, लाल टोपी, धोतर परिधान केलेले पुरुष, संस्कृतीप्रेमी नागरिकांची रेलचेल दिसून येणार आहे. तसेच बैलगाडी, उंट, रथ, घोडागाडी मिरवणूक काढून कार्निव्हलमधून शेतकऱ्यांच्या व्यथा, पर्यावरणाचा ऱ्हास, स्थानिक संस्कृती, परंपरा यांच्या संवर्धनाची असा त्रिवेणी संगम पहावयास मिळणार आहे. यंदा पारंपरिक वेशभूषेत आबालवृद्धांचा सहभाग आकर्षित करणार आहे.

यंदा नाताळ सणाला प्लास्टिक हटाव, पर्यावरण प्रबोधन, राज्यातील परंपरा, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विषयांची जनजागृती केली जाणार आहे; तर बोलीभाषा जतनीकरणासाठी सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ काम करत आहे. खाद्यपदार्थ, संस्कृती, प्रदर्शन यासह विविध दुर्मिळ वस्तूंना उजाळा देत आहेत. एकंदरीत येशूची भक्तिमय वातावरणात आराधना करताना ख्रिस्ती समाज नाताळ सणाला निसर्गाशी घट्ट असलेली नाळ जपणार आहे, हे विशेष म्हणावे लागेल.

कार्निव्हलची धूम
वसईत २५ डिसेंबर रोजी ख्रिसमसनिमित्त दुपारी २ वाजता रमेदीतील घोगळेवाडी येथून कार्निव्हल मिरवणूक प्रस्थान करणार आहे. यासाठी नागरिकांनी एकत्र येत जय्यत तयारी केली आहे. या वेळी विजय पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पाटील, घोगळेवाडी मंडळ अध्यक्ष नेव्हिल डिसोजा, को. म. सा. प. पालघर जिल्हा कार्याध्यक्ष अनिलराज रोकडे, कार्निव्हल मिरवणुकीचे प्रणेते सुनील डिमेलो, कॅथॉलिक बँकेचे माजी उपाध्यक्ष गेगरी डिमेलो व कार्निव्हल मिरवणूक समितीचे प्रमुख रॅन्डोल डिमेलो यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहणार आहेत.

जुन्या चर्चमध्ये उत्साह
उत्तर वसईत नंदाखाल (१५७३), पापडी (१५८२), निर्मळ (१५५६), सांडोर (१५६८) येथे जुने चर्च आहेत. येथे उत्साहात नाताळ साजरा केला जातो. तसेच गिरिज, रमेदी, सांडोर, होळी, भुईगाव, गास, निर्मळ, वाघोली, उमराळे, बोळिंज, आगाशी, नानभाट, नंदाखाल, देवतलाव, पाचुबंदर, वसई या ठिकाणी असलेले चर्चदेखील पुरातन आहेत. प्रार्थना करताना शिष्टबद्धता, शांती आणि नियमांचे पालन केले जाते.

वसईतील सर्वधर्म एकात्मता आणि स्थानीय संस्कृती हे नाताळ सणाचे एक मुख्य वैशिष्ट्य बनले आहे. प्रभू येशूच्या भक्तीसोबतच मातृभाषा संवर्धन, समाजप्रबोधन केले जाते. शोभायात्रेतून पर्यावरणासह विविध सामाजिक विषयांची जनजागृती केली जाणार आहे.
- शरली घोन्सालवीस, सागरशेत, वसई

संस्कृती, बोलीभाषा संवर्धनासाठी वसईकर नेहमीच पुढाकार घेतात. बाळ येशूच्या आगमन काळात म्हणजेच नाताळ सणाला बोलीभाषा, संस्कृतीचा संदेश पसरावा, यासाठी प्रयत्न असतो. विविध सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत.
- जिम रॉड्रिग्ज, संस्थापक,
सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com