थोडक्‍यात बातम्‍या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्‍या नवी मुंबई

थोडक्‍यात बातम्‍या नवी मुंबई
पोलिस दल स्थापन दिनानिमित्त रेझिंग सप्ताह
उरण, ता. ६ (वार्ताहर)ः पोलिस दल स्थापना दिनाचे औचित्य साधून २ जानेवारी ते ८ जानेवारी २०२४ दरम्यान उरण पोलिस ठाणे तर्फे रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने उरण पोलिस ठाणे हद्दीतील एन.आय. हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना पोलिस अधिकाऱ्यांनी सायबर गुन्हे, महिला सुरक्षा संदर्भात व अमली पदार्थाच्या सेवनामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी १०० ते १२५ विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. तसेच ३ जानेवारी रोजी सायंकाळी उरण पोलिस ठाणे हद्दीतील महिला दक्षता कमिटी सदस्य व ज्येष्ठ नागरिक यांची उरण पोलिस ठाण्यात पोनि(गुन्हे) कांबळे यांनी बैठक घेतली. या बैठकी वेळी सावित्रीमाई फुले जयंतीनिमित्त त्यांच्‍या फोटोला पुष्पहार अर्पण करून ज्येष्ठ नागरिक व महिलाचे सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच त्‍यांच्‍या मदतीकरिता पोलिस ठाणे अथवा हेल्पलाईन नंबर ११२ वर संपर्क करण्याबाबत सूचना दिल्या. यावेळी उपस्थित महिला सदस्य व ज्‍येष्ठ नागरिक यांच्या समस्या संदर्भात चर्चा करून त्यांचे निरासन करण्यात आले. या वेळी २० ते २५ महिला दक्षता कमिटी सदस्य व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
...........................
ग्रामपंचायत पागोटे तर्फे शिवस्मारकाचे लोकार्पण
उरण (बातमीदार) ः ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये शिवसमर्थ परिवर्तन आघाडीची विजयाची वर्षपूर्ती व वचनपूर्ती सोहळानिमित्त शिवस्मारकाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी १९८४ च्या गौरवशाली शेतकरी लढ्यातील पंच हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. त्यानंतर माजी आमदार मनोहर भोईर व माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते शिवस्मारकाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच यावेळी हुतात्मा स्मारक नूतनीकरणाचे देखील उद्घाटन करण्यात आले. गावातील नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा व्हावा, गावकऱ्यांचे आरोग्य निरोगी राहावे या अनुषंगाने ग्रामपंचायत कार्यालय आवारातच शुद्ध पिण्याच्या पाणी (आर. ओ प्लॅन्ट)चे लोकार्पण मनोहर भोईर, बाळाराम पाटील यांच्या हस्ते झाले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पागोटे ग्रामपंचायतचे सरपंच कुणाल पाटील, उपसरपंच सतीश पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुजित तांडेल यांनी विशेष मेहनत घेतली. यावेळी फुंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत मान्यवरांचे स्वागत केले. या कार्यक्रमात उरणच्या इतिहासात प्रथमच बँजो बिट्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बँजो बिट्स स्पर्धेमध्ये एकूण पाच संघाने सहभाग घेतला होता. यापैकी खंडोबा बिट्स सोनारी बँजो पथकाने प्रथम क्रमांक पटकविला.
.............
घोडीवली कातकरी वाडीवर जातीच्या दाखल्यासाठी शिबिर
उरण, ता. ६ (वार्ताहर) ः आदिवासी बांधवांच्या विविध प्रकारचे दाखले काढून देण्यासाठी उरण सामाजिक संस्था सरसावली आहे. टाटा स्टील फांऊडेशनच्‍या मदतीने घोडीवली आदिवासी वाडीवर जातीच्या दाखल्‍यांचे फार्म भरून घेण्यासाठी कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला कातकरी बांधवांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यावेळी २५७ कातकरी बांधवांचे फार्म भरण्यात आले आहे.
कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे आणि अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू आहे. उप विभागीय अधिकारी अजित नैराळे आणि तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या सहकार्याने हा कॅम्प घेण्यात आला होता. रायगड भूषण दत्ता गोंधळी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर, मनीष कातकरी, रत्नाकर घरत, टाटा स्टील फाउंडेशन तर्फे उदय गावंड, आदिवासी विकास निरीक्षक आदींनी कॅम्पसाठी अधिक मेहनत घेतली.
................
उलवे येथे आज धम्म परिषदेचे आयोजन
वाशी, ता. ६ (बातमीदार)ः उलवे येथे ७ जानेवारी रोजी प्रथमच धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्‍हणून भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर उपस्थित राहणार आहेत. तसेच भन्ते डॉ. भिक्खू एस. आर. इंदवंस महाथेरो यांच्या करकमलाने व त्यांच्या हस्ते भव्यदिव्य बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटन होणार असून त्यांच्या उपस्थितीत देशविदेशातील भिक्खुसंघ व भिखुणी संघ उपस्थित असणार आहेत. या कार्यक्रमास निखिल मेश्राम (जीएसटी आयुक्त ) व अनिता मेश्राम (अतिरिक्त
जिल्हाधिकारी) प्रमुख उपस्थिती म्‍हणून हजर राहणार आहेत. तरी कार्यक्रमाला सर्व धम्म उपासक, उपासिका यांनी उपस्थित राहावे असे आव्हान उलवे येथील बौद्ध धम्म परिषद कोअर कमिटी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

.....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com