ज्युपिटर हॉस्पिटलशेजारील पार्कींग प्लाझाकडे दुर्लक्ष

ज्युपिटर हॉस्पिटलशेजारील पार्कींग प्लाझाकडे दुर्लक्ष

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १२ : वागळे ‘एमआयडीसी’त बहुमजली वाहनतळाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन झाले; मात्र महापालिकेने ज्युपिटर हॉस्पिटल व विवियाना मॉलवरील सर्व्हिस रस्त्यावर उभारलेला वाहनतळ पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. या भागातील सर्व्हिस रोडवरील वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर वाहनतळ सुरू करण्याची सातत्याने मागणी केली जात आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी केला आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत पार्किंगची समस्या आहे; मात्र पार्किंगचे धोरण नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. त्यात वाहतूक शाखेकडून कोणत्याही क्षणी दुचाकी वाहने टोईंग व्हॅनवरून नेली जातात; तर मोटारींना जॅमर लावला जातो. अशा परिस्थितीत महत्त्वाच्या ठिकाणी पार्किंग प्लाझा उभारण्याची आवश्यकता आहे. महापालिकेने ज्युपिटर हॉस्पिटल व विवियाना मॉलजवळच्या भूखंडावर पार्किंग प्लाझा उभारला आहे. त्याला पाच वर्षांचा काळ उलटला. कोरोना आपत्तीच्या काळात या ठिकाणी तात्पुरते हॉस्पिटल उभारले होते. त्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी हॉस्पिटल उभारण्याचा घाट घालण्यात आला, परंतु सुमारे दीड महिन्यांपूर्वी पार्किंग प्लाझा कायम ठेवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी लक्षात घेत पार्किंग प्लाझा सुरू करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करत आहेत, परंतु त्याची दखल घेतलेली नाही.

पार्किंग प्लाझा सुरू केला जात नसल्यामुळे महापालिकेचेही आर्थिक नुकसान होत आहे, याकडेही वाघुले यांनी लक्ष वेधले आहे. या पार्किंग प्लाझाची क्षमता सुमारे १२०० वाहनांची आहे. या ठिकाणी रुग्णालय व मॉलमध्ये पार्किंगसाठी जागा नसल्यामुळे वाहने रस्त्यालगत उभी केली जातात. त्यामुळे या भागात सकाळी व सायंकाळी वाहतूककोंडी भेडसावत असते. महापालिकेने पार्किंग प्लाझा सुरू केल्यास वाहतूककोंडी टळू शकते. त्यामुळे या ठिकाणी पार्किंग प्लाझा सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com