

अंबरनाथ, ता. ३ (बातमीदार) : अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिरावरील झीज झालेल्या शिल्पांची झीज थांबवण्यासाठी केंद्रीय पुरातत्त्व विभागाने काम सुरू केले आहे. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक शुभ मजुमदार यांच्या देखरेखीखाली विज्ञान आणि रसायन विभागाच्या तज्ज्ञांनी काम सुरू केले असून शिवमंदिर परिसर विकासाच्या कामासाठी राज्य शासनाने १४० कोटी रुपये मंजूर केले आहेत.
शिवमंदिर वास्तूचे जतनीकरण आणि परिसर विकासाचे काम एकाचवेळी सुरू होणार आहे. ज्येष्ठ प्राच्यविद्या संशोधिका आणि शिवमंदिराच्या अभ्यासिका डॉ. कुमुद कानिटकर यांनी गेल्या महिन्यात समाजमाध्यमांवर मंदिराच्या वास्तूवरील काही शिल्पांची छायाचित्रे प्रसिद्ध करून हजार वर्षांपूर्वीचा हा कलाश्रीमंत वारसा नष्ट होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. कानिटकर यांनी व्यक्त केलेल्या चिंतेची गंभीर दखल घेत केंद्रीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मंदिर परिसराची पाहणी केली होती. या पाहणीनंतर या प्राचीन वास्तूचे जतनीकरणाच्या दृष्टीने आराखडा तयार केला व त्यानुसार कार्यवाही करण्याचा निर्णय पुरातत्त्व विभागाने घेतला होता. त्यानुसार आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
मंदिराच्या वास्तूवरील शिल्पांची झपाट्याने होणारी झीज आणि मंदिरात पावसाळ्यात होणारी गळती रोखण्यासाठी पुरातत्त्व विभागाने तातडीने जतनीकरण मोहीम राबविणे आवश्यक होते. प्राच्यविद्या संशोधक डॉ. कुमुद कानिटकर आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पुरातत्त्व विभागाकडे पाठपुरावा करीत होते. पुरातत्त्व विभागातील वरिष्ठ शिल्पकार सुधीर वाघ आणि रसायनतज्ज्ञ उपेंद्र तोमार यांनी मंदिराच्या मागच्या बाजूकडील अधिक हानी झालेल्या शिल्पांची दुरुस्ती सुरू केली आहे. चार-पाच दिवस ते काम करणार आहेत. त्यानंतर महाशिवरात्री असल्याने काम थांबवले जाईल. पुढे एप्रिल महिन्यापासून शिल्पांच्या डागडुजीचे काम सुरू राहील, अशी माहिती केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे अधिकारी कैलास शिंदे यांनी दिली.
होमहवन, नारळ फोडण्यावर प्रतिबंध
मंदिरातील वास्तूत होणारा दुग्धाभिषेक, ध्वनिक्षेपण यंत्रणेचा वापर, घंटानाद, होमहवन, नारळ फोडणे आदींना प्रतिबंध केला असून पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधितांना त्याची कल्पना दिली आहे.
शिवमंदिराच्या वास्तूची पाहणी करून दुरुस्ती आणि डागडुजीबाबत सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार अधिक हानी झालेल्या शिल्पशिळांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल. येणाऱ्या आर्थिक वर्षात या कामासाठी निधीची तरतूद केली जाणार आहे.
-कैलास शिंदे, पुरातत्त्व विभाग अधिकारी, मुंबई.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.