नाचणीपासून नाविण्यपूर्ण लाडू, बिस्किट

नाचणीपासून नाविण्यपूर्ण लाडू, बिस्किट

ठाणे : सानिका वर्पे

स्त्रीला नवनिर्मितीचे प्रतीक मानले जाते. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद खऱ्या अर्थाने स्त्रियांमध्ये असते. तिच्यासमोर कितीही संकटे, आव्हाने, समस्या आल्या तरी त्या समस्येला आकार देत त्यातून नवनिर्मितीची दांडगी इच्छाशक्ती तिच्या ठायी असते. मुरबाडसारख्या ग्रामीण भागातील अशाच कर्तृत्ववान स्त्रियांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला आहे. घरची आर्थिक स्थिती बेताची आहे. आजूबाजूचे वातावरण पूर्णत: विपरित असूनही मुरबाडच्या वनिता घोरड यांनी बचत गटाच्या माध्यमातून इतर महिलांपुढे एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. नाचणीपासून वेगवेगळे पदार्थ तयार करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले आहे. त्यामुळे कष्ट करण्याची ताकद असल्यास आपोआप नव्या वाटा दिसू लागतात, त्यातून स्वत:सोबत इतरांचाही उत्कर्ष घडवून आणू शकतो, हे वनिता घोरड यांच्या जीवन प्रवासातून उलगडत जाते.

मुरबाडसारख्या ग्रामीण भागात फारशी रोजगाराची साधने नाहीत. तसेच स्त्रियांना नोकरी आणि शिक्षणाच्या संधी फारच कमी असल्याने तिचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल इतकंच मर्यादित आहे. आपसूकच इथली स्त्री नवऱ्याच्या कमाईवर अवलंबून असते. त्यातील नवऱ्याची कमाई १० ते १२ हजार इतकी अत्यंत तुटपुंजी असते. या पगारात संसाराचा गाडा हाकणे अत्यंत कठीण आहे. उत्पन्नाची इतर साधने नसल्याने मुलांना पैशांअभावी अर्धवटच शाळा सोडावी लागते. या सगळ्या बाबींचा विचार करून आपणही संसाराला हातभार लावावा, या हेतूने वनिता घोरड यांनी गावातील महिलांना हाताशी घेत महिला बचत गटाची स्थापना केली. अगदी शंभर रुपयांपासून बचत गट स्थापन झाला. केवळ पैशांची बचत न करता महिलांच्या हाताला काम मिळायला हवे. या हेतूने त्यांनी २०१९ मध्ये ज्वेलरीमध्ये नथ तयार करण्याचा उद्योग सुरू केला; मात्र या व्यवसायात अडचणी आल्याने त्यांना तो बंद करावा लागला; मात्र वनिता घोरड यांनी त्याही परिस्थितीत हार मानली नाही. २०२० मध्ये शासनाकडून मिलेटचे पदार्थ बनवण्याचे काम मिळू लागले. मग त्यांनी यात काही वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न केला.

नाचणी हा पौष्टिक आहार आहे. त्यामुळे नाचणीपासून फक्त पापड आणि भाकरीव्यतिरिक्त अन्य कोणकोणते वेगळे पदार्थ तयार करता येतील, याची त्यांनी चाचपणी केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले, की नाचणीपासून लाडू, बिस्कीटही बनवता येऊ शकतात. मग त्यांनी नाचणीपासून लाडू, बिस्कीटबरोबरच वडी, चकली असे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न केला. याला ग्राहकांची पसंती मिळत गेली.

उत्तर प्रदेशातून मागणी
पदार्थ पहिल्यांदा स्वयंसहाय्यता पंचायत समितीच्या आदेशावरून तालुक्याला पाठवले. तसेच मुरबाडमध्येच मिलेटचे प्रदर्शन आयोजित केले होते. या वेळीदेखील नाचणीच्या पदार्थांचे स्टॉल बचत गटातील महिलांनी लावले. या प्रदर्शनातील नाचणीचे पदार्थ सर्वांना आवडले. त्यानंतर या महिलांनी मागे वळून पाहिले नाही. आज नाचणीपासून तयार केलेले पौष्टिक पदार्थ थेट उत्तर प्रदेशमधील लखनऊपर्यंत पोहोचले आहेत. लहान मुलांना या नाचणीच्या पदार्थातून चांगली पोषण तत्त्वे मिळत असल्याने पालकांकडून मागणी असते. लहान मुलांसोबत मोठी माणसंदेखील लाडू, बिस्किटे मागवतात. चांगल्या चवीबरोबरच त्यांना यातून जीवनसत्त्व व पौष्टिक आहार मिळतो.

लहानग्यांची पसंती
लहान मुले घरगुती आहार घेण्यास टाळाटाळ करतात. त्यांना चमचमीत पदार्थ हवे असतात. त्यामुळे भाजी-चपाती असेल तर मुलं जास्त खात नाहीत; मात्र त्यांना चॉकलेट, लाडू, कॅडबरी असे सांगितले की ते पदार्थ आपोआप खातात, त्यामुळे या महिला बचत गटातील महिलांनी नाचणीपासून तयार केलेल्या पदार्थांना तशी नावे दिली. कारण नाचणीचे पदार्थ हे दिसायला रंगाने चॉकलेटसारखे असतात, त्यामुळे लहान मुले हे पदार्थ अगदी आवडीने खातात.

नाचणीपासून विविध पदार्थ तयार करण्याचा उद्योग सुरू केला तेव्हा पहिल्यांदा सगळे लोक मला हसत होते. लोक म्हणत होते, की हे असे काळे दिसणारे पदार्थ कोण घेणार; मात्र याच उद्योगामुळे प्रत्येक महिलेला सर्व खर्च वजा करून दर महिन्याला ४ ते ५ हजार मिळत आहेत.
- वनिता घोरड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com