उरणमध्ये बेसुमार वृक्षतोड

उरणमध्ये बेसुमार वृक्षतोड

उरणमध्ये बेसुमार वृक्षतोड
वृक्षतोड कायद्याचा गैरवापर; प्रशासनाचे दुर्लक्ष
उरण, ता. १० (बातमीदार) : उरण तालुक्‍यात सध्या बेसुमार वृक्षतोड केली जात आहे. वृक्षतोड परवानाच्‍या नावाखाली लाकडांचा व्‍यवसाय करणारे अवैध ठेकेदार, आरा गिरणीमालक, लाकूड तस्कर मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून बेसुमार वृक्षतोड होत असल्‍याने उरण येथील वनसंपदा धोक्‍यात आली आहे.
एकीकडे शंभर कोटी वृक्षलागवडीच्या वल्गना सुरू असताना, दुसरीकडे खासगी वृक्षतोड अधिनियमांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात अनुसूचित व बिगर अनुसूचित अशा पाच लाख वृक्षांची खुलेआम तोड करण्यात येत आहे. वन खात्याचे उपवनसंरक्षक, सहायक वनसंरक्षक, वन परिक्षेत्राधिकारी, महसूल खात्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या तोडीचे व वाहतुकीचे परवाने देण्यात येतात. खासगी वृक्षतोड अधिनियम कायदा हा विशेषत: शेतकरी व कष्टकरी यांच्या हितासाठी निर्माण करण्यात आला आहे. स्वत:च्या शेतातून कृषी अवजारे, इमारती लाकूड व जळतन फाटा मिळण्यासाठी हा कायदा करण्यात आला. मात्र, नंतर या कायद्याचा शेतकऱ्यांऐवजी आरा गिरणीधारक, लाकूड व्यापारी यांनाच फायदा होऊ लागला आहे. अनुसूचित वृक्षांमध्ये चंदन, खर, सागवान, शिसम अशा मौल्यवान वृक्षांचा समावेश होतो. बिगरअनुसूचित वृक्षांमध्ये बाभूळ, निंब अशा प्रजातींच्या आडजात वृक्षांचा समावेश होतो. चंदन व खर ही झाडे तोडण्यास परवानगी दिली जात नाही. मात्र, राज्यात व परराज्यात इमारती व फर्निचर लाकडासाठी प्रचंड मागणी असलेल्या खासगी सागवान झाडाच्या वृक्षतोडीला परवानगी देण्यात येते. ही परवानगी देण्याचे अधिकार हे वन परिक्षेत्राधिकाऱ्यांना आहे. तर झाडावर शिक्के मारण्याचे अधिकार सहायक वनसंरक्षकांना, प्रकरण नियमानुकूल आहे किंवा नाही हे पाहण्याचे अधिकार उपवनसंरक्षकांना दिले आहेत. सागवान वृक्षांचे झाड तोडताना ते बुंध्यात किमान साठ सेंटीमीटर आकाराचे असावे ही प्रमुख अट आहे. मात्र, अलीकडे या वृक्षतोड अधिनियमांचा शेतकऱ्यांऐवजी लाकूड व्यापारी, तस्कर सर्वात जास्त गैरफायदा घेत आहेत. डोंगर पोखरून माती काढण्यासाठी उरण तालुक्यातील लाखो वृक्षांची खुलेआम तोड झाली आहे. उरण येथील डोंगर परिसरात नियम फाट्यावर मारून अनेक वृक्षांची तोड सुरू आहे. विशेष म्हणजे, ही झाडे मुळासकट उपटून त्यांचे अस्तित्व नष्ट करण्यात येत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील वनसंपदा धोक्यात आली आहे.
....................................
प्रतिक्रिया
वृक्षतोड व त्यावर होणारी कारवाई वनविभागाच्या अखत्यारित येत असून आम्हाला तशा तक्रारी प्राप्त झाल्या तर आम्ही त्वरित वनविभागाला कळवतो. मात्र, अशी वृक्षतोड निदर्शनास येत असेल तर नागरिकांनी पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. जेणेकरून यावर कारवाई करून वृक्षतोडीला आळा बसेल.
-उद्धव कदम, उरण, तहसीलदार.
..........................
वृक्षतोडीच्या तक्रारी तर आम्हाला प्राप्त झालेल्या नाहीत. मात्र, आमच्या निदर्शनास जर कोणी वृक्षतोड करताना आढळले आणि वृक्षतोड खासगी जागेतील असेल तर आम्ही त्यांच्यावर १९६४ कलम अंतर्गत कारवाई करतो. वनविभागाच्या जागेत कोणी वृक्षतोड करत असेल तर इंडियन फॉरेस्ट ॲक्टअंतर्गत कारवाई करतो.
-एन. जी. कोकरे, वनअधिकारी, उरण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com