गर्भधारणेसाठी सायन रुग्णालय वरदान

गर्भधारणेसाठी सायन रुग्णालय वरदान

गर्भधारणेसाठी सायन रुग्णालय वरदान
४ महिन्यांत २३ महिलांना गर्भधारणा; वंध्यत्व निवारण ओपीडीतून दिलासा
भाग्यश्री भुवड ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : मुंबईतील ३२ वर्षीय रहिवासी सुलभा डोईफोडे (नाव बदलेले) यांच्या लग्नाला आठ वर्षे होऊनही गर्भधारणा होत नव्हती. पीसीओडी या समस्येने त्या ग्रस्त होत्या. सायन रुग्णालयातील वंधत्व ओपीडी आणि अत्याधुनिक उपचारपद्धतींमुळे त्यांच्या समस्येवर तोडगा निघाला आणि आता त्या १२ आठवड्यांच्या गर्भवती आहेत. आपल्याला झालेल्या गर्भधारणेवर त्यांचा विश्वास बसत नसल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले होते.
अनेक वर्षे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा न झाल्याने अनेक महिलांना स्‍त्री-रोग तज्‍ज्ञांची मदत घ्यावी लागते. त्यातून डॉक्टर्स आयव्हीएफ ही पद्धत गर्भधारणेसाठी सुचवतात; मात्र, सायन रुग्णालयात वंध्यत्व निवारणासाठी सुरू झालेल्या ओपीडीत येणाऱ्या महिलांना नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा कशी करता येईल, याचे समुपदेशन आणि उपचार दोन्ही दिले जातात.
ऑक्टोबरपासून पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या या ओपीडीला जवळपास १५० हून अधिक महिलांनी भेट दिली. सायन रुग्णालयाच्या स्त्री-रोगतज्ज्ञ विभागाच्या सहायक प्राध्यापक आणि युनिट प्रमुख डॉ. अर्चना भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० पैकी आतापर्यंत २३ महिलांना यशस्वीरित्या गर्भधारणा राहिली आहे. या ओपीडीत दोन टप्प्यांत प्रक्रिया केल्या जातात. प्राथमिक टप्प्यातील उपचारांनंतरही गर्भधारणा होत नाही, त्यांना ‘आयव्हीएफ’ ही दुसऱ्या टप्प्यातील पद्धती सांगितली जाते.
पहिल्या टप्प्यात महिलेच्या शारीरिक स्थितीनुसार तपासण्या, चाचण्या व समुपदेशन करून गोळ्या आणि इंजेक्शन दिले जाते. अनेक महिलांच्या अंडाशयात काही समस्यांमुळे अंडे तयार होत नाही. गर्भाशयातील गर्भपिशवी, अंडनलिका आणि अंडाशयात जर ब्लॉक, गाठ किंवा फायब्रॉईड असेल तर गर्भधारणा राहत नाही. अनेकदा अंडे तयार होत नाही, या सर्वासाठी प्राथमिक टप्प्यात चाचण्या केल्या जातात. अंडे तयार होण्यासाठी मासिक पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पाच दिवस औषधे दिली जातात. ही औषधे-गोळ्यांच्या किंवा इंजेक्शनच्या स्वरूपात असतात. काही महिलांमध्ये गोळ्या देऊनही अंडे तयार होत नाही. त्यांना इंजेक्शन दिले जाते. यानंतर पाळीच्या १० व्या दिवसापासून सोनोग्राफी केली जाते. ज्यात अंडे तयार झाले की नाही हे तपासले जाते. या अंड्याचा १८ ते २२ मिलिमीटर एवढा आकार असतो. या आकारानंतर अंडे फुटणे अपेक्षित असते.
अंडे नैसर्गिकरित्या फुटल्‍यास इंजेक्शन दिले जात नाही. अंडे फुटण्याच्या कालावधीत जोडप्याला समुपदेशन करून प्लान रिलेशन ठेवण्यास सांगितले जाते. यातून त्यांना गर्भधारणा होते. आम्ही नैसर्गिक आणि प्लान रिलेशन ठेवून गर्भधारणेला प्राधान्य देत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. प्रसूती होईपर्यंत संपूर्ण जबाबदारी आमच्या विभागाची असते. आयव्हीएफसाठी एड्रॉलॉजी विभागातील डॉ. प्रकाश पवार, डॉ. हमिद हे शस्‍त्रक्रिया आणि वैद्यकीय व्यवस्थापनासाठी मदत करणार आहेत, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. दरम्यान, १५० पैकी २५ ते ३५ टक्के महिलांना आयव्हीएफची गरज भासते, असे सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रुतिका माकडे यांनी सांगितले.

अत्याधुनिक मशिनरी
श्रद्धा चॅरिटेबल फाऊंडेशनने स्त्री-रोग विभागाला काही मशिनरी दान केल्या आहेत. प्राथमिक तपासणीसाठी लेमिनार फ्लोअर, टेस्ट ट्यूब वॉर्मर, मायक्रोस्कोप, सेंट्रिक फ्युज, स्पर्म काऊंटिग चेंबर ही उपकरणे दान केली आहेत. या पाचही उपकरणांचा वापर आययूआय म्हणजेच इंट्रायूटरिन इन्सेमिनेशनसाठी केला जातो. ज्या पुरुषाचे शुक्राणू काऊंट आणि दर्जा कमी असतो, त्यांना वाढवले जाते. दर्जा सुधारल्यानंतर ते शुक्राणू महिलेच्या गर्भाशयात सोडले जातात. अशा किमान ६ सेंटिग्स महिलांवर केल्या जातात, असे विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. नेहा कामथ यांनी सांगितले.

ही आहेत कारणे
अंडाशयात अंडे तयार होत नाही, मासिक पाळी वेळेवर येत नाही, आनुवंशिक आणि जीवनशैलीतील बदल, गर्भाशयाच्या बाजूला रक्ताच्या गाठी, अंडनलिकेत ब्लॉक, व्यसनामुळे पुरुषांच्या शुक्राणूंच्या दर्जावर परिणाम, उशिरा लग्न होणे.

कोट
लायन्स क्लब ऑफ जुहू यांच्यामार्फत अडीच कोटींची देणगी देण्याचे ठरले आहे, या देणगीतून ‘आयव्हीएफ’ केंद्रासाठी मशिनरी घेतली जाईल. यंत्रणा आली की दोन महिन्यांत ‘आयव्हीएफ’ करता येणार आहे, यासाठी धारावी छोटा सायन रुग्णालयात २५०० स्क्वेअर फूट जागा बघितली आहे.
- डॉ. मोहन जोशी,
अधिष्ठाता, सायन रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com