पनवेल, तळोज्यातून गुन्हे सिद्धीचा पुरावा

पनवेल, तळोज्यातून गुन्हे सिद्धीचा पुरावा

पनवेल, ता. १० (वार्ताहर) : गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे गुन्हेगारांना कायद्याचे भय वाटत नव्हते. त्याअनुषंगाने गुन्हे सिद्धीचे प्रमाण वाढविण्यासाठी पनवेलमधील नवी मुंबई पोलिसांच्या ‘मिशन कन्विक्शन’च्या या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी राज्यातील इतर पोलिस आयुक्तालय तसेच सर्व युनिटमध्ये राबवण्याची घोषणादेखील त्यांनी केली.
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयअंतर्गत एनआरआय आणि पनवेल तालुका पोलिस ठाणे येथे मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाचे (एव्‍हिडन्स मॅनेजमेंट सेंटर-इएमएस) तसेच तळोजा पोलिस ठाणे येथील पुरावा व्यवस्थापन कक्षाचे (व्हेईकल एव्‍हिडन्स सेंटर) उद्घाटन रविवारी (ता. १०)देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, कोकण विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, सह-पोलिस आयुक्त संजयसिंह येनपुरे, अपर पोलिस आयुक्त दीपक साकोरे उपस्थित होते. आपल्या देशात ब्रिटिश काळापासून जवळपास सव्वाशे वर्षे जुने भारतीय दंड संहिता (आयपीसी) कायदे चालत आले आहेत. या कायद्याचा उपयोग ब्रिटिशांनी भारतावर राज्य करण्यासाठी केला; पण शंभर वर्षे ब्रिटिशकालीन कायद्यात बदल करतानाच त्यात आधुनिकतेची कास धरून क्रिमिनल जस्टिस सिस्टीम पुढे गेली पाहिजे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे केंद्र सरकारने कायद्यामध्ये गुणात्मक बदल केला आहे. या नवीन कायद्यामुळे गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी फायदा होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
----------------------------------------------
एकाच ठिकाणी कागदपत्रांचे जतन
गुन्ह्यातील मुद्देमाल ठेवण्यासाठी पोलिस ठाण्यात पुरेशी जागा नसल्याने मुद्देमाल खराब होणे, ओला होणे यांसारख्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे मुद्देमाल योग्य पद्धतीने न्यायालयासमक्ष सादर करण्यात पोलिसांना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिस आयुक्तालयाअंतर्गत सर्व पोलिस ठाण्यातील मुद्देमाल एव्हिडन्स मॅनेजमेंट सेंटरच्या माध्यमातून एकाच ठिकाणी जतन केले जाणार आहे. त्यामुळे जागेची, वेळेची आणि मनुष्यबळाची बचत होण्यास मदत होणार आहे.
-------------------------------------------------------
देशातील पहिले आयुक्तालय
नवी मुंबई पोलिस दलात मध्यवर्ती पुरावा व्यवस्थापन कक्षाची संकल्पना पनवेल तालुका आणि एनआरआय पोलिस ठाणे येथे राबवले गेली आहे. या अंतर्गत मिशन कन्विक्शन, नेल्सन सिस्टीम, यथार्थ, ई-पैरवी आणि आता एव्‍हिडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आदी आधुनिक यंत्रणेची कास धरणारे प्रकल्प सुरू करणारे नवी मुंबई पोलिस आयुक्तालय हे देशातील पहिले आयुक्तालय बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com