

मुंबई, ता. १७ : नामवंत नाटककार, गीतकार, लेखक, पटकथाकार, नाट्य-चित्रपट निर्माते अशा बहुआयामी भूमिकेतून मनोरंजनाचा अमूल्य ठेवा रिता करत रसिकांना अखंड रिझवणारे दिवंगत मधुसूदन कालेलकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी जन्मशताब्दी महोत्सव १९ ते २२ मार्च या कालावधीत दादर येथील शिवाजी नाट्य मंदिरात होणार आहे.
हा महोत्सवर सांस्कृतिक कार्य संचालनालय, मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या विशेष पुढाकाराने होणार आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शब्दबद्ध केलेल्या सांगीतिक गीतांच्या मैफलीचा विशेष सोहळा ज्येष्ठ दिग्दर्शक-अभिनेते राजदत्त, सुप्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ, सचिन पिळगांवकर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी ७ वाजता शिवाजी मंदिर नाट्यगृहात होणार आहे. नाट्यमहोत्सव आणि सांगीतिक मैफिल सोहळा रसिकांसाठी विनामूल्य आहे. वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचे सुपुत्र अनिल कालेलकर यांनी हा महोत्सव आमच्यासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा असल्याच्या भावना व्यक्त केल्या.
असे असेल नाटकाचे सादरीकरण
जन्मशताब्दी महोत्सवात मधुसूदन कालेलकरलिखित ‘दिवा जळू दे सारी रात’ (१९ मार्च), ‘डार्लिंग डार्लिंग’ (२० मार्च), ‘नाथ हा माझा’ (२१ मार्च) या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. या नाटकांच्या सादरीकरणात एक अभिनव प्रयोग करण्यात येणार आहे. ‘दिवा जळू दे सारी रात’ तसेच ‘डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाचे तीन अंक तीन वेगळ्या नाट्यसंस्था सादर करणार आहेत. ''डार्लिंग डार्लिंग’ या नाटकाचा पहिला अंक पार्थ थिएटर्स यांच्या विद्यमाने दिग्दर्शक मंगेश सातपुते, दुसरा अंक श्री कलाधारिणी प्रॉडक्शन्स दिग्दर्शक गणेश पंडीत, तिसरा अंक अनामय दिग्दर्शक देवेंद्र पेम सादर करणार आहेत. ‘दिवा जळू दे सारी रात’ या नाटकाचा पहिला अंक कल्याणच्या अभिनय यांच्या वतीने दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव, दुसरा अंक व्हिजन व्हॉईस एनऍक्ट दिग्दर्शक श्रीनिवास नार्वेकर, तर तिसरा अंक माणूस फाऊंडेशन दिग्दर्शक डॉ. सोमनाथ सोनवलकर सादर करणार आहेत.
जीवनप्रवास
दिवंगत मधुसूदन कालेलकर यांचा जन्म २२ मार्च १९२४ वेंगुर्ल्यात झाला. मार्च २०२३-२०२४ हे त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. आपल्या कारकिर्दीत त्यांनी ११० हिंदी व मराठी चित्रपटांचे लेखन केले. ७० पेक्षा जास्त चित्रपट गीते आणि ३० पेक्षा जास्त नाटके लिहिली. पाच नाटकांची निर्मिती केली. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मधुसूदन कालेलकरांना त्यांच्या ‘हा माझा मार्ग एकला’ या सिनेमासाठी १९६१ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.