गळतीच्या पाण्यावर टॅंकरमालक मालामाल

गळतीच्या पाण्यावर टॅंकरमालक मालामाल

पनवेल, ता. ४ (बातमीदार) : वाढत्या उन्हासह परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. अनेक ठिकाणी दिवसाआड पाणी सोडले जात आहे. असे असताना पनवेल, करंजाडे येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळाच्या जलवाहिनीला कायमचीच गळती लागलेली असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत आहे. वाया जात असलेले पाणी टँकरमालक चोरून नेत असून या फुकटच्या पाण्याची दोन हजार रुपये प्रतिटँकर दराने विक्री केली जात आहे.
चिंचपाडा, करंजाडे, वडघर गावाजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईनला गळती लागली असून लाखो लिटर पाणी यामुळे वाया जात आहे. काही जण मुद्दामहून पाईपलाईनला छिद्र पाडून पाण्याची चोरी करत असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पनवेल, पनवेल महापालिका, जेएनपीटी, सिडको आदी विभागांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच पाणीसाठा अपुरा असल्याने पाणीकपातीला सुरुवात करण्यात आली आहे. अशा प्रकारे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याने एखाद्या प्रभागाची तहान या पाण्यावर भागवली जाऊ शकते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे पाणीगळती बंद करावी, अशी मागणी समोर येत आहे. जलवाहिनीला लागलेल्या गळतीमुळे या ठिकाणाहून ये-जा करणारे नागरिकदेखील संताप व्यक्त करीत आहेत.

---------
वाहने, कपडे धुण्याचे ठिकाण
सध्या करंजाडे परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. बांधकामे, वीटभट्टी, नर्सरी व वॉशिंग सेंटरला या गळतीचे पाणी वापरले जात आहे. त्यामुळे टॅंकर लॉबीचे फावत आहे. तसेच बांधकाम साईट्सवरील मजूरदेखील याच ठिकाणी येऊन कपडे, भांडी धूत असतात. अनेक वाहनचालक आपली वाहने या ठिकाणी धुताना दिसत आहेत. परिसरातील ड्रायव्हर व मजूरही येथेच येऊन अंघोळ करताना नजरेस पडतात. त्यामुळे आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. या परिसरात पाच ते सहा ठिकाणी जलवाहिनीला गळती लागलेली दिसून येते. ३८ वर्षे जुनी पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे गळती बंद केली तरी अवघ्या काही तासांत पुन्हा या वाहिनीला गळती लागते.

--------
एमजीपीची जलवाहिनी ही ३८ वर्षे जुनी असून ती जीर्ण झालेली आहे. त्यामुळे दुरुस्ती करूनही पाणीगळती थांबत नाही. या लाईनवर अवलंबून असलेले नागरिक दुसऱ्या जागी विस्थापित झालेले नाहीत. यासाठी गेल्या साडेचार वर्षांपासून आम्ही नोटीस देत आहोत. पारगाव आणि ओवळा विस्थापित झाल्यानंतर ही जलवाहिनी बंद करण्यात येणार आहे. नवीन जलवाहिनी एनएच ४ च्या बाजूने टाकलेली असून ती कार्यान्वित आहे.
- के. बी. पाटील, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com