रंगीबेरंगी गुढ्यांनी बाजारपेठा सजल्या

रंगीबेरंगी गुढ्यांनी बाजारपेठा सजल्या

डोंबिवली, ता. ४ (बातमीदार) : हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्रशुद्ध प्रतिपदेला साजऱ्या होणाऱ्या गुढीपाडव्याला नवउपक्रम, संकल्पांनी सुरुवात केली जाते. शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस विविध पद्धतीने साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवशी मराठी नववर्षाचे स्वागत केले जाते. डोंबिवलीतील बाजार गुढीपाडव्याचे साहित्य आणि वस्तूंनी भरून गेला आहे. गुढीसाठी लागणाऱ्या नव्या काठीसह रेशमी-तलम, लहान तांब्या, कृत्रिम फुलांचा हार, पाने, माळा आणि साखरगाठीची खरेदी सुरू झाली आहे.

पारंपरिक सजावट केलेल्या नावीन्यपूर्ण रंगीबेरंगी रेडिमेड गुढी विक्रीसाठी उपलब्ध असून साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी दिसून येत आहे. तसेच रेडिमेड गुढीला ग्राहकांची जास्त पसंती आहे. लाल, पिवळा, नारंगी आणि पांढऱ्या रंगांच्या तसेच ड्रायफ्रुट असलेल्या साखरगाठींनी दुकाने सजली आहेत. गुढीपाडव्याला अवघे काही दिवस उरल्याने साखरगाठींच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शोभायात्रांचीही जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशांच्या गजरात मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढण्याची परंपरा असल्याने शहरातील अनेक मंडळे तयारीत व्यस्त आहेत.

डोंबिवलीतील दुकाने साहित्यांनी सजली असून नऊ इंचाची रेडिमेड गुढी १०० ते १२० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. एक फुटाची रेडिमेड गुढी १५० रुपयांपासून मिळत आहे. दीड फुटाच्या गुढीची किंमत २०० ते २५० रुपये आहे. सजवलेल्या गुढी दर्जा व आकारानुसार ९०० ते १,२०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. तर लाल, गुलाबी, पिवळा, नारंगी, गुलाबी रंगाच्या साखरगाठी २० रुपये ते १०० रुपयांपर्यंत मिळत आहे. गुढीपाडव्यानिमित्त वाहन, घर, दागिने, मोबाईल इत्यादी महत्त्वाच्या वस्तूंची खरेदी केली जाते. त्यामुळे नागरिक आकर्षित करण्यासाठी शोरूम व ऑनलाईन खरेदीवर मोठ्या प्रमाणात ऑफर ठेवल्या आहेत.

पूजेसाठी अन् लहान आकारातील तयार गुढ्या, पूजेसाठी लागणाऱ्या साहित्यांचा बॉक्स, गुढी उभारणीसाठी लागणारे विविध रंगांतील वस्त्र, अशा विविध प्रकाराच्या साहित्यांची खरेदी होत आहे. यंदा लहान आकारातील तयार गुढ्यांना सर्वाधिक मागणी आहे, आप्तेष्टांना भेट देण्यासाठी तयार गुढ्यांची खरेदी होत आहे. मोठ्या आकारातील तयार गुढ्याही बाजारात उपलब्ध आहेत. त्याचीही खरेदी होत असून, अगरबत्तीपासून ते हळदी-कुंकू, असे गुढी पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याच्या बॉक्सलाही पसंती आहे.

गृहखरेदीसाठी सवलती
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्याला नवीन वस्तू खरेदी करण्याचा अनेकांचा कल असतो. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी बांधकाम व्यावसायिकांकडूनदेखील आकर्षक जाहिराती केल्या आहेत.

रेडिमेड साडीला पसंती
गुढपाडव्यासाठी रेडिमेड गुढीचे वस्त्र बाजारात उपलब्ध झाले आहेत. रेडिमेड गुढीच्या वस्त्रांना महिलांची मोठ्या प्रमाणात मागणी आहे. पैठणी, जरीकाठ, रेशन काठ, खाण-काठाची रेडिमेड साडी बाजारामध्ये उपलब्ध आहेत.

१०० ते ८०० रुपयांपर्यंतच्या गुढी बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रेडिमेड गुढी विदेशात विक्रीसाठी पाठवल्या आहेत.
- रोहित प्रसाद, डोंबिवली

गुढ्या तयार करण्यासाठी एक महिना लागतो. यंदा गुढीच्या किमतीत १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- सुमित कदम, डोंबिवली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com