नविन इमारतीत खर्डी ग्रामीण रुग्णालय

नविन इमारतीत खर्डी ग्रामीण रुग्णालय

खर्डी, ता. ४ (बातमीदार) : खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीच काम पूर्ण झाले आहे; मात्र उद्घाटनाआधीच निवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्याने लोकार्पणाशिवायच नवीन इमारतीमध्ये १ एप्रिलपासून रुग्णांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. रुग्णालयातील यंत्रसामग्रीमुळे अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. रुग्णालयाची इमारत प्रशस्त असून रुग्णांना आता बसण्याची सोय केली आहे. प्रत्येक विभागाला वेगवेगळ्या रूम देण्यात आल्याने गर्दीची समस्या दूर झाली आहे. लवकरच या रुग्णालयालगत ट्रामा केअर सेंटरचे काम सुरू होणार असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. रुग्णालयात रुग्णांना सुविधा मिळणार आहेत.

मागील १४ वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या एकाच छोट्याशा इमारतीत रुग्णांची तपासणी, मलमपट्टी, हे सर्व एकाच ठिकाणी होते. पावसाळ्यात रुग्ण दाखल असलेल्या ठिकाणी गळके शेड असल्याने रुग्णांची गैरसोय होत असे; तर पंखे नसल्याने ऐन उन्हाळ्यात रुग्णांना गर्मीमुळे त्रास होत असे. या सर्व अडचणींमुळे कर्मचारी व रुग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रुग्णांना पुढील उपचारासाठी शहापूरमधील रुग्णालयात पाठवावे लागत होते. या गैरसोयीची दखल घेत सरकारने खर्डी ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ओपीडी सुरू केल्याची माहिती खर्डीचे वैद्यकीय अधीक्षक आशिलाक शिंदे यांनी दिली; तर रुग्णालयात पाण्याची कमतरता असल्याने पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य प्रशांत खर्डीकर यांनी केली आहे.

अपघातग्रस्त व गंभीर रुग्णावर तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी ११ कोटी ५१ लाख रुपये खर्च करून खर्डी ग्रामीण रुग्णालय इमारत व कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दोन इमारती बांधल्या आहेत. या रुग्णालयात ३० खाटा उपलब्ध आहेत. एक्सरे मशीन, एसीजी व सोनोग्राफी मशीन उपलब्ध आहेत. तर दिवसेंदिवस तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सकाळच्या ओपीडीसाठी दोन डॉक्टर उपलब्ध करावेत, अशी मागणी उपसरपंच मौसीम शेख यांनी केली आहे.

प्रशासनाने रुग्णालयात उपलब्ध असलेल्या एक्सरे, सोनोग्राफी मशीनसाठी तज्ञांची नेमणूक करावी, एक्सरे व सोनोग्राफीची सेवा सुरू करावी, जेणेकरून येथील गोरगरीब रुग्णांची आर्थिक कोंडी न होता वेळेवर उपचार मिळतील.
- चंद्रकांत घरत, सामाजिक कार्यकर्ते

रुग्णालयाच्या नवीन इमारतीत ओपीडीसाठी दोन डॉक्टर उपलब्ध करण्यासाठी कागदोपत्री प्रयत्न सुरू असून तज्ज्ञ डॉक्टरची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
- डॉ. आशिलाक शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, खर्डी ग्रामीण रुग्णालय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com